
भूखंड हडप करण्याचा डाव उधळला
उल्हासनगर, ता. १५ (वार्ताहर) : पाणीपुरवठा विभागाच्या भूखंडावर भलेमोठे अनधिकृत बांधकाम उभारून भूखंड हडप करण्याचा डाव उल्हासनगर महापालिकेने हाणून पाडला आहे. सोमवारी जेसीबीच्या साह्याने अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
कॅम्प नंबर ५ गायकवाड पाडा येथे पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीतील भूखंड आहे. त्यावर साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून जलकुंभ उभारण्याचे काम प्रस्तावित आहे; मात्र हा भूखंड रिकामा असल्याची संधी साधून भूमाफियांनी त्यावर तब्बल ६०० फुटांचे अनधिकृत बांधकाम केले होते. ही माहिती समजताच महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या आदेशानुसार नोडल अधिकारी तथा प्रभाग समिती चारचे सहायक आयुक्त गणेश शिंपी, मुकादम शामसिंग यांनी या बांधकामावर जेसीबी फिरवून हे बांधकाम उद्ध्वस्त केले.
पाणीपुरवठा विभागाच्या शासकीय भूखंडावर अनधिकृत बांधकाम उभारल्याप्रकरणी संबंधित भूमाफियावर एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली.