
पालिका रुग्णालयातील परिचारीकांचे सामुदायिक रजा आंदोलन यशस्वी
पाच दिवसांच्या आठवड्यासाठी
परिचारिकांचे रजा आंदोलन
मागणीला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : पाच दिवसांच्या आठवड्यासाठी महापालिकेच्या सर्व रुग्णालयांतील परिचारिकांनी सोमवारी (ता. २३) सकाळी दहा वाजता सामूहिक आंदोलन केले. आंदोलनात तब्बल दोन हजारांहून अधिक परिचारिकांनी सहभाग घेतला. आता नाही तर कधी नाही... परिचारिका एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत त्यांनी एफ दक्षिण महापालिका प्रभाग कार्यालय दणाणून सोडले.
दरम्यान, प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन परिचारिकांची मागणी मान्य केल्याने सामुदायिक रजा आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली दोन हजारहून अधिक परिचारिकांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभाग घेतला. पालिकेच्या सर्व रुग्णालयांतील परिचारिकांना रजेचा नियम लागू करण्याचा प्रस्ताव त्वरित पाठवून दोन दिवसांत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी वर्गाची मान्यता घेण्यात येणार असल्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली सदर मागणी मान्य करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. आंदोलनात कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे व प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या ठाकूर यांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सरचिटणीस सत्यवान जावकर, सरचिटणीस अॅड. रचना अग्रवाल इत्यादींच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करून परिचारिकांची मागणी मान्य केली असल्याचे सांगण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे अॅड अग्रवाल यांनी सांगितले.