
जे. जे. रुग्णालय झाले १७८ वर्षांचे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : राज्य सरकार संचालित जेजे मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय सोमवारी १७८ वर्षांचे झाले. वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना १५ मे १८४५ रोजी झाली होती. याच पार्श्वभूमीवर सोमवारी रुग्णालयाच्या आवारात १७८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
१७८ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या या महाविद्यालयात आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून लाखो रुग्णांना या रुग्णालयाचा लाभ झाला आहे.या वर्धापन दिन कार्यक्रमात १९५७ च्या बॅचचे डॉ. सुनील पंड्या, डॉ. शुभा पंड्या, डॉ. आशा चक्रवर्ती आणि इतर माजी विद्यार्थी, डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील इतर कर्मचारीही उपस्थित होते. या वेळी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आठवणींना उजाळा दिला. सध्या रुग्णालयाचे अधिष्ठाता, अधीक्षक, उपअधीक्षक आणि वैद्यकीय अधीक्षक ही पदे या महाविद्यालयातून शिकलेल्या विद्यार्थ्यांनी व्यापलेली आहेत, ही उल्लेखनीय आणि अभिमानास्पद बाब आहे. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमही झाले.