
उघड्यावरील कचऱ्याने नाकीनऊ
नेरूळ, ता.१६(बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील कचराकुंड्या हटवण्यात आल्या आहेत. स्वच्छ सर्वेक्षणा अंतर्गत शहर सुशोभीकरणासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे. पण पालिकेच्या या प्रयत्नांना अपयश येताना दिसत असून कचराकुंडी हटवल्यामुळे उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधीने स्थानिक त्रस्त आहेत.
नवी मुंबई शहरात विविध सेक्टर, गावठाण, झोपडपट्टी भागात महापालिकेच्या माध्यमातून कचराकुंडी ठेवण्यात आल्या होत्या. आता शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याकुंड्या टप्प्याटप्प्याने हटवण्यात येत आहे. महापालिकेकडून कचरा संकलनासाठी घंटागाडीची सुविधा देण्यात आली आहे. कचराकुंड्या हटवलेल्या काही ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. परंतु, काही ठिकाणी पालिकेचे प्रयत्न फोल ठरत आहेत. त्यामुळे अशा परिसरात सध्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याचे चित्र आहे. नेरुळ सेक्टर ८ आणि १० मध्ये रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कुंड्या हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उघड्यावरच कचरा टाकल्याने दुर्गंधी पसरली आहे.
---------------------------------------
डासांची मोठ्या प्रमाणात पैदास
महापालिकेने कचराकुंड्या हटवल्या असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यांवरच कचरा टाकण्यात येत आहे. कुत्रे, मांजरी हा कचरा पसरवत असल्याने रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या नागरिकांना पदपथावरून जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तसेच अनेक ठिकाणी घंटागाडी वेळेवर येत आहे. परंतु, नागरिक त्याचा वापर करत नसल्याने कचरा रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे कचऱ्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे.
-----------------------------------------
कचराकुंड्यांची संख्या अपुरी असल्यामुळे कचरा टाकायचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पालिकेने कचराकुंडी पुन्हा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून पदपथांलगत कचरा टाकला जाणार नाही.
-पूजा राऊत, नागरिक
------------------------------------------
पालिकेकडून घंटागाडीचा पर्याय नागरिकांना दिला आहे. रात्रीच्या वेळी देखील पालिकेची गाडी विविध प्रभागांमध्ये फिरत असते. तरी देखील रस्त्यांवर कचरा टाकत जात असल्याने अशा लोकांवर कारवाई केली जात आहे.
-बाबासाहेब रांजळे, उपआयुक्त, घनकचरा विभाग, महापालिका