
रेल्वेची धडक बसल्याने दोघांचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेची धडक बसल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. हे तरुण रेल्वेरूळ क्रॉस करत असावेत किंवा रील बनविण्यासाठी रेल्वेरुळांवर गेले असावेत. तेव्हा गाडीचा अंदाज न आल्याने त्यांना रेल्वेची धडक बसून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात करण्यात आली असून मुलांचे मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
सोमवारी सायंकाळी एका दुर्घटनेत दोन तरुणांना आपला जीव गमावला आहे. चेतन गोगावले (२२) आणि सुयोग उत्तेकर (२५) अशी दोघांची नावे असून दोघेही डोंबिवली पूर्वेतील रहिवासी आहेत. ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेची धडक या तरुणांना बसली. त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर इजा झाली होती. त्यांना त्वरित शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या दोन्ही तरुणांचे मृतदेह त्यांच्या परिवाराकडे देऊन कल्याणमधील रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पंचनाम्यासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.