
हळदीवरून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू
नवी मुंबई (वार्ताहर) : हळदीचा कार्यक्रम संपवून घरी निघालेल्या तरुणाच्या स्कुटीला वाहनाने धडक दिल्याची घटना जेएनपीटी पनवेल रस्त्यावर जासई येथे घडली होती. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला असून उरण पोलिस ठाण्यात फरारी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल आहे.
पनवेलमधील सोमटणे गावात राहणारा महेंद्र कांबरी (३१) हा त्याच भागातील एका खासगी कंपनीत काम करत होता. रविवारी सायंकाळी महेंद्रच्या मावस बहिणीच्या मुलीचा हळदीचा कार्यक्रम असल्याने तो लहान भाऊ व आईसह उरण मधील गोवठणे येथे गेला होता. हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर महेंद्र पहाटे ५ च्या सुमारास स्कुटीवरून गोवठणे येथून सोमाटणे येथे आपल्या घरी जात होता. यावेळी जेएनपीटी ते पनवेल मार्गावरील जासई रोड येथील विग्रो लॉगीपार्क कंटेनर यार्डच्या गेट समोर एका वाहनाने महेंद्रच्या स्कुटीला धडक दिली होती. यात त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.