संकेतस्‍थळाच्या माध्यमातून तरुणाची फसवणूक

संकेतस्‍थळाच्या माध्यमातून तरुणाची फसवणूक

अंधेरी, ता. १६ (बातमीदार) ः नोकरीसंदर्भातील संकेतस्‍थळाच्या माध्यमातून मर्चंट नेव्हीसह इतर ठिकाणी नोकरीची संधी असल्याची बतावणी करुन बेरोजगार तरुणांची फसवणूक करणार्‍या एका सायबर ठगाला दिल्लीतून दहिसर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. रविकुमार अशोककुमार वर्मा असे या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात त्याच्या इतर सहकार्‍यांची नावे उघडकीस आली असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
दहिसर येथे राहणारा तक्रारदार तरुणाने बारावीनंतर तामिळनाडूच्या चेन्नई शहरातून मर्चंट नेव्हीचा कोर्स पूर्ण केला होता. सध्या तो नवी मुंबईच्या एका खासगी कंपनीत कामाला आहे. दुसर्‍या नोकरीच्या शोधात असल्याने एका संकेतस्थळावर नोकरीसाठी अर्ज केला होता. या अर्जानंतर त्याला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो एका मर्चंट नेव्हीच्या कंपनीमध्ये एचआर रिक्रुटर असल्याचे सांगितले होते. या कंपनीत तो नवीन तरुणांची भरती करत आहे, असे सांगून त्याने त्याचे शैक्षणिक कागदपत्रांची मागणी केली. त्यामुळे त्याने त्याला मेलवरुन त्याचे शैक्षणिक कागदपत्रे पाठवून दिली होती. या कागदपत्रांची पूर्तता करणे, मेडीकल, कंपनीत राहण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्थेसह प्रोसेसिंग फीसाठी त्याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. नोकरीची गरज असल्याने त्याने त्याला ऑनलाईन सुमारे साडेचार लाख रुपये पाठविले होते. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला चेन्नई येथे जाईन करण्यास सांगून त्याने त्याला ऑफर लेटर मेलवरुन पाठवून दिले होते. ते ऑफर लेटर घेऊन तो चेन्नईला गेला होता. या वेळी त्याला ते लेटर बोगस असल्याचे समजले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने मुंबईत आल्यानंतर दहिसर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. ही मोहीम सुरू असताना रविकुमार वर्मा या सायबर ठगाला दिल्लीतून पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने नोकरीच्या आमिषाने अनेकांना गंडा घातला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com