
मिरा-भाईंदरमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षक गणवेश
भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देण्यात येत आहेत. त्यासोबत आता महापालिकेच्या विद्यार्थ्यांनाही आकर्षक रंगाचा गणवेश देण्यात येणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना नव्या रंगातील गणवेश मिळणार आहेत.
महापालिकेच्या ३६ शाळांमधून सुमारे साडेसात हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना खासगी शाळांसारखेच अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आगामी शैक्षणिक वर्ष येत्या १५ जूनला सुरू होत आहे. महापालिका विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून गणवेश, बूट, दफ्तर, वह्या मोफत दिल्या जातात. शाळा सुरू होताच पहिल्याच आठवड्यात हे साहित्य विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे, असे स्पष्ट आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे नव्या आकर्षक रंगाचा गणवेशही मुलांना शाळा सुरु होताच मिळेल, याची व्यवस्था कंत्राटदाराने करण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
महापालिकेचे शिक्षण आणि शाळांच्या इमारती स्मार्ट होत असतानाच महापालिकेचे विद्यार्थी देखील स्मार्ट दिसले पाहिजेत, यावर आयुक्त दिलीप ढोले यांनी विशेष भर दिला आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना फिकट रंगाचा, नजरेत न भरणारा असा गणवेश दिला जात होता. महापालिकेच्याच एका कार्यक्रमात ही बाब आयुक्तांच्या नजरेस आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गणवेश बदलून त्याजागी खासगी शाळांप्रमाणे विद्यार्थ्यांना आकर्षक रंगाचे गणवेश देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
पिवळ्या रंगाचा चौकडीचा शर्ट आणि निळ्या रंगाची पँट असा नव्या गणवेशाचा रंग असणार आहे. त्यामुळे स्मार्ट शिक्षण घेण्यासोबतच महापालिकेचे विद्यार्थी स्मार्टही दिसणार आहेत.
- दिलीप ढोले,
आयुक्त, मिरा भाईंदर महापालिका