अमृत योजनेची कामे चुकीच्या पद्धतीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृत योजनेची कामे चुकीच्या पद्धतीने
अमृत योजनेची कामे चुकीच्या पद्धतीने

अमृत योजनेची कामे चुकीच्या पद्धतीने

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत केडीएमसीच्या २७ गावांत पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे. या अंतर्गत पाण्याच्या टाकीउभारणीचे काम सुरू असून ही कामे योग्य पद्धतीने केली जात नसल्याच्या तक्रारी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्याकडे आल्या होत्या. मंगळवारी (ता. १६) आमदारांनी कामाची पाहणी करत काही त्रुटी आढळून आल्याने अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. या वेळी आमदार पाटील यांनी काम योग्य पद्धतीने सुरू आहे का, असे विचारल्यावर अधिकाऱ्यांची गाळण उडाली. अखेर अधिकाऱ्यांनी संबंधित कामाची तपासणी करण्यात येईल, असे आमदारांना सांगितले.
काटई, भोपर येथे सुरू असलेले टाकी उभारण्याचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याची तक्रार आमदार राजू पाटील यांच्याकडे आली होती. त्यातच भोपर येथे टाकीचे काम सुरू असताना टाकीचा काही भाग कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आमदार पाटील यांनी मंगळवारी सकाळी काटई गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांना कामात अनेक त्रुटी आढळून आल्या. या वेळी अमृत जलयोजनेचे प्रभारी कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांच्यासह अभियंता श्रीकृष्ण उपस्थित होते. आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे काम योग्य पद्धतीने सुरू आहे का, असे विचारले. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांना देता येत नसल्याने आमदार आणखी भडकले. कामाच्या गुणवत्तेविषयी जबाबदार अधिकाऱ्याची लेखी तक्रार करून कारवाई करण्याची सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

----------------
अमृत योजना ही २७ गावांसाठी असून त्यातील १८ गावे ही माझ्या मतदारसंघात आहेत. त्याचा राग कुठेतरी काढला जात असेल, हे मला माहीत नाही; परंतु ही पद्धत बरोबर नाही. लोकांचे पाणी तोडून विकासाचे प्रश्न रखडवणे योग्य नाही.
- राजू पाटील, आमदार, कल्याण ग्रामीण

-----------------
टाकीचे स्लॅब भरताना सेंट्रिंग लूज झाल्याने ते पडले. स्लॅब कोसळला नाही. भोपर येथे स्लॅबचे कास्टिंग सुरू होते. सेंट्रिंगमध्ये प्रॉब्लेम झाल्याने ते पडले. याविषयी संबंधिताना कळवण्यात आले आहे. उद्या पाहणी करून आम्हाला अहवाल मिळणार आहे. व्हीजेटीआयकडूनदेखील ऑडिट करून घेण्यात येईल.
- शैलेश कुलकर्णी, प्रभारी कार्यकारी अभियंता, अमृत जल योजना