
मुंबईचे कमाल-किमान तापमान वाढले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईत उकाडा कायम असून, सोमवारच्या (ता. १५) तुलनेत आज कमाल तापमानात काहीशी वाढ झाली. पुढील ४८ तासांतही तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस उन्हाचे चटके आणखी सहन करावे लागणार आहेत. तापमानसह आर्द्रताही वाढली आहे. कुलाबा ७०; तर सांताक्रूझ ६८ टक्के आर्द्रतेची नोंद झाली आहे.
मंगळवारी मुंबईतील कमाल तापमान कुलाबा येथे ३४.६; तर सांताक्रूझ ३४.३ अंश नोंदवले गेले. दोन्ही ठिकाणच्या कमाल तापमानात एक अंशाची वाढ झाली. किमान तापमानातही वाढ झाली असून कुलाबा येथे २८; तर सांताक्रूझ येथे २८.६ अंश तापमान नोंदवले गेले. किमान तापमानातही अनुक्रमे १ आणि २ अंशाची वाढ झाली आहे. तापमानसह आर्द्रता ही वाढल्याने दिवसा आणि रात्रीही घालमेल वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या (ता. १७) शहर आणि उपनगरात आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान स्थिर राहणार असून पुढील ४८ तासात मात्र त्यामध्ये १ ते २ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे.