
प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
कासा, ता. १६ (बातमीदार) : तलासरी तालुक्याशेजारील जंगलात झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ललिता चंदऱ्या राहया (वय २०) व प्रदीप रांजड (वय १९) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलांची नावे आहेत. मृत दोघेही तलासरी येथील राहणारे होते. जंगलातील झाडाला एकाच दोरीने दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असून विवाहाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने ही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांचाही वेगवेगळ्या ठिकाणी विवाह करण्यासाठी कुटुंबीयांनी लग्नाची बोलणी केल्याच्या रागातून दोघांनीही आत्महत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तलासरी पोलिस अधिक तपास करत आहेत.