भारनियमनाविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

भारनियमनाविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

अंबरनाथ, ता. १६ (बातमीदार) : बदलापुरात सुरू असलेल्या भारनियमनाविरोधात मंगळवारी महाविकास आघाडीच्या वतीने महावितरण कार्यालयावर आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या आंदोलनानंतर भारनियमन होणार नसल्याचे स्पष्टीकरण महावितरणतर्फे देण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने भारनियमन होणार, अशा समाजमाध्यमांवर पसरलेल्या संदेशामुळे नागरिकांना घाम फुटला होता. या प्रकाराविरोधात बदलापुरात महाविकास आघाडीने मंगळवारी महावितणरच्या कार्यालयाला धडक देऊन अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. बदलापुरात चक्राकार पद्धतीने भारनियमन केले जाणार, असा आशय असलेले संदेश शुक्रवारी महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांकडून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. यामुळे नागरिकांत संतापाची भावना निर्माण झाली होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सचिव हरिश्‍चंद्र थोरात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख किशोर पाटील आदींनी मंगळवारी महावितरणच्या पश्चिम कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला. भारनियमन केल्यास आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडीने या वेळी दिला. त्यानंतर शिष्टमंडळाने महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

----------------------
तांत्रिक बिघाडामुळे खंडित
कोणतेही भारनियमन केले जाणार नसल्याचे महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र शुक्रवार, शनिवार आणि रविवार तीनही दिवस आणि त्यापूर्वीही कायम विविध कारणामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे भारनियमन सुरू झाल्याचा भ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला होता. तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची स्पष्टोक्ती महावितरण जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com