
अलिबागमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण
अलिबाग, ता. १६ (बातमीदार) : पळस्पे ते इंदापूर या चारपदरी महामार्गासाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना कवडीमोल भावात देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत जमिनाला वाढीव भाव द्या; नाही तर जमिनी परत द्या, अशी मागणी केली आहे. याबाबत शेतकरी जनार्दन नाईक यांनी मंगळवार (ता. १६) पासून अलिबाग येथील जिल्हा अधिकारी कार्यालयसमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला अन्यायग्रस्त शेतकरी समीर नागोठणेकर, काशीनाथ नाईख, जितेंद्र जोशी, गणेश भोपी, खंडू भोईर, दिलीप भोय, विठ्ठल कदम यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
पनवेल ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. शिवाय ज्या प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत २० एप्रिल रोजी प्रकल्पग्रस्त शेतकरी जनार्दन नाईक यांनी उपोषण सुरू केले होते; मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे घेण्यात आले. आठ दिवसात निर्णय घेण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. २५ दिवसांत न्याय मिळावा, असा अल्टीमेटम नाईक यांनी दिला होता; तरीही वाढीव मोबदला देण्याची कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शेतकरी जनार्दन नाईक यांनी पुन्हा १६ मेपासून उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामध्ये अनेक शेतकरी पाठिंबा दर्शवण्यासाठी सहभागी झाले आहेत. न्याय मिळेपर्यंत हा लढा असणार आहे, असे जनार्दन नाईक यांनी सांगितले.