
आजी-आजोबांना कोल्हापूरची विमान टूर
ठाणे, ता. १८ : ठाण्यातील ज्येष्ठांची विमानवारीद्वारे आध्यात्मिक भक्तीची इच्छा काजूवाडी येथील श्री साईधाम आनंद संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीतील ६५ वर्षांवरील भाग्यवान आजी-आजोबांना थेट विमानाने कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घडवण्यासाठी नेले जाणार आहे. या उपक्रमात तब्बल १५० पेक्षा अधिक ज्येष्ठांनी नावनोंदणी केली होती. येत्या ४ व ५ जुलै रोजी ज्येष्ठांना विनामूल्य विमान प्रवास घडवला जाणार आहे. यातील उर्वरित भाग्यवंतांनाही येत्या काळात विमानाने कोल्हापूरला नेले जाणार आहे.
ठाणे शहरातील काजूवाडी येथील प्रसिद्ध श्री साई पंचपरमेश्वर मंदिराचा १७ वा वार्षिक जत्रौत्सव एप्रिल महिन्यात पार पडला. शहराचे माजी महापौर, श्री साईधाम आनंद संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना ठाणे शहरप्रमुख अशोक बारकू वैती यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. या माध्यमातूनच धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर अशोक वैती यांच्या संकल्पनेतून प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना विशेष विमानाने देवदर्शन घडवले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ज्येष्ठांना विमानाने मुंबई ते कोल्हापूर नेले जाणार असून मुंबई विमानतळावर काजूवाडी येथून बसने या ज्येष्ठ नागरिकांना नेले जाणार आहे. यासोबतच कोल्हापूर येथे ज्येष्ठांची राहण्याची व्यवस्था, चहा, नाश्ता व जेवणही या उपक्रमानव्ये विनामूल्य होणार आहे, अशी माहिती आयोजक अशोक वैती यांनी दिली.