
मालमत्ताधारकांवर नोटिसांचा भडिमार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ : मालमत्ता कर वसुलीसाठी पनवेल महापालिका पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आली आहे. कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाने नोटिसा पाठवण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कर भरायचा की नाही, याबाबत संभ्रमावस्थेत असल्याने करदाते दुहेरी संकटात सापडले आहेत.
पनवेल पालिकेचा मालमत्ता कर हा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. नव्याने स्थापन झालेल्या महापालिकेची आर्थिक स्थैर्यासाठी मालमत्ता कर वसुलीवर मदार आहे. यामुळे पालिकेने थकीत कर वसुलीवर जोर दिला आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे भर पावसात थकीत कर वसुलीचा वेग मंदावण्याची शक्यता असल्याने पालिकेने मे महिन्यातच थकीत कर वसुलीवर भर दिला आहे. यासाठीच थकीत करधारकांवर नोटिसांचा भडिमार केला जात आहे. पालिकेने आत्तापर्यंत एक लाख ७३ हजार ३६० देयकांचे वाटप केले आहे; तर पोस्टाने ७० हजार २२२ देयके पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे २ लाख ४३ हजार ५८२ करधारकांना नोटिसा बजावल्या आहेत.
-----------------------------------------------
एक हजार ७२८ कोटींची वसुली बाकी
१ एप्रिल २०२३ ते १६ मे २०२३ या दरम्यान ५१ कोटी १५ लाख वसुली झाली आहे. मागच्या आणि या वर्षीची अशी एकूण एक हजार ७२८ कोटी वसुली अद्याप बाकी आहे. गेल्या वर्षीच्या आर्थिक काळात २७४ कोटी वसुली झाली आहे. त्यामुळे वर्षभरात मालमत्ता कर न भरणाऱ्यांनाच नोटिसा दिल्या असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.