
लोकअदालतीमुळे महापालिका मालामाल
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.१७ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विविध करांच्या थकबाकीबाबत देशभरात लोकअदालत भरवण्यात येत आहे. याच अनुषंगाने लोकसेवा विधी प्राधिकरण, ठाणे यांच्या माध्यमातून बेलापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात नुकत्याच झालेल्या लोकअदालतीमुळे थकीत पाणी बिलाची एक कोटीहून अधिक रकमेची वसुली करण्यात महापालिकेला यश आले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा देयकांची १ लक्ष व त्यावरील अधिकची थकीत रक्कम असलेल्या ५०४ पाणी देयक थकबाकीदार ग्राहकांना न्यायालयामार्फत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या थकबाकीदारांकडून पाणी देयकाची ३९ कोटी २ लाख इतकी थकीत रक्कम येणे बाकी होते. त्यामुळे ३० एप्रिल रोजी झालेल्या दुसऱ्या लोकअदालतीमध्ये महापालिकेने ७०१ ग्राहकांना नोटीस बजावली होती. त्यापैकी ५० हजार व त्याहून अधिक थकीत पाणी देयक रक्कम असणाऱ्या ग्राहकांनी आत्तापर्यंत १ कोटी २ लाखांहून अधिक रक्कम थकीत नवी मुंबई महापालिकेकडे भरणा केलेली आहे.
-------------------------
लोकअदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांनी थकीत पाणी बिलाची रक्कम भरावी, हा दृष्टिकोन जरी असला तरी पाणी देयके थकवणाऱ्यांना दिलासा मिळावा यादृष्टीने महापालिका प्रयत्नशील आहे. अशा ग्राहकांना थकीत पाणी देयकांमधील थकीत विलंब शुल्क, तसेच दंडात्मक रकमेवर २५ टक्के सूट दिली आहे.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, महापालिका