वाहतूक पोलिसांमुळे मनस्ताप

वाहतूक पोलिसांमुळे मनस्ताप

जुईनगर, ता. १८ (बातमीदार)ः वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य आहे. पण अधिकारांचा वापर करून वाहतूक पोलिसांकडून बेलापूर रेल्वे पोलिसांच्या हद्दीतीलच वाहने उचलली जात असल्याने पोलिसांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्याची मागणी होत आहे.
बेलापूर रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक पोलिसांच्या मनमानीने स्थानिक त्रस्त झाले आहेत. बेलापूर स्टेशनकडून आग्रोळी गावाकडे जाण्याचा एक रस्ता आहे. अर्बन हट आणि स्टेशन इमारतीमधील हा रस्ता असल्याने तो रेल्वेच्या हद्दीत येतो. मुळातच हा रस्ता निमुळता असल्याने या ठिकाणावरून दुचाकीच जाऊ शकतात. असे असताना या ठिकाणी लागलेल्या गाड्या वाहतूक पोलिसांकडून टोईंग केल्या जात आहेत. त्यामुळे एरवी हद्दीत मोबाईल चोरी वा अन्य काही घटना घडली तरी पोलिस विभाग रेल्वेची हद्द असल्याचे कारण देत नागरिकांची बोळवण करत असताना बेलापूर रेल्वे हद्दीतील पार्किंग केलेली वाहने उचलण्यासाठी कार्यतत्परतेने काम करत असल्याने स्थानिकांकडून विरोध होत आहे.
----------------------------------------------------
वाहनचालकांचे आक्षेप
- सर्वसामान्यपणे वाहन टोईंग करताना त्या ठिकाणी संबंधित वाहतूक विभागाचे नाव खडूने नमूद करणे अनिवार्य असते. जेणेकरून वाहनचोरीला गेले की वाहतूक पोलिसांनी टोईंग केले हे समजावे. मात्र, बेलापूर रेल्वे हद्दीतील कारवाईवेळी गाड्या उचलताना असे काहीच लिहिले जात नाही.
- अनेक ठिकाणी टोईंग केलेल्या वाहनांवरील दंड वसुलीसाठी ई-चलन पद्धत वापरली जाते; परंतु बेलापूर येथे होणाऱ्या कारवाई वेळी टोईंगचा दंड मात्र रोखीने घेतला जात आहे. त्यामुळे वाहतूक विभागाच्या कारभारावरच स्थानिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.
- बेलापूर स्टेशनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, पण त्यांच्यासाठी पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आधी सुविधा द्या, त्यानंतर कारवाई करा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
-------------------------------------
या मार्गावरून बेलापूर रेल्वे स्टेशन, तसेच अर्बन हटमध्ये कोणत्याही प्रकारचे चारचाकी वाहन जात नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होण्याचा प्रश्नच नाही. असे असताना ही कारवाई अन्यायकारक आहे.
- सुनील कदम, रेल्वे प्रवासी
-------------------------------------
टोईंग विभागात भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. अन्य ठिकाणी टोईंगवरील दंडवसुलीसाठी ई-चलन पद्धत वापरली जाते; परंतु टोईंगचा दंड मात्र रोखीने घेतला जातो. प्रत्येक कारवाईचा दंड हा कॅशलेस पद्धतीनेच स्वीकारण्याचा नियम करावा.
- जया कुदळे, वाहनचालक
---------------------------------------------
बेलापूर रेल्वेस्थानक आवारात सिडकोची पार्किंग आहे. या ठिकाणी नागरिकांनी वाहने पार्क करावीत, अन्य ठिकाणी दुचाकी उभ्या केल्याने सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने कारवाई होते.
- तिरुपती काकडे, उपायुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com