
उपजिल्हा रुग्णालयात १४ परिचारिका गैरहजर
भिवंडी, ता. १७ (बातमीदार) : शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णावर उपचार करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या दोन शिफ्टच्या कर्मचाऱ्यांना तीन शिफ्टचे काम करावे लागल्याने त्यांच्यावर ताण येत आहे. त्यातच या उपजिल्हा रुग्णालयात नियुक्त केलेल्या १४ परिचारिका गैरहजर असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत.
स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयास २०० बेडची सुविधा दिल्याच्या घोषणा शासनाने करूनही या रुग्णालयात अपेक्षित कर्मचारी नेमलेले नाहीत. त्यामुळे स्थानिक रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. या रुग्णालयासाठी एकूण २७ परिचारिकांची मंजुरी शासनाने दिली आहे. त्यापैकी ८ परिचारिका नियमित असून ५ परिचारिका कंत्राटी पद्धतीने सेवा देत आहेत, तर १४ परिचारिकांना नियुक्तीपत्र देऊनही त्या कामावर हजर झाल्या नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून या परिचारिका हजर न झाल्याने रुग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती विभागात दररोज १० ते १५ प्रसूती होत असताना रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांच्यासाठी केवळ ३० खाटा या विभागात ठेवल्या आहेत. या विभागासाठी तीन डॉक्टर असून चार परिचारिका तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. त्यापैकी तीन परिचारिकाची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली आहे, अशी माहिती कार्यालयीन अधीक्षक सीमा माने आणि प्रसूतिगृहाच्या इन्चार्ज सविता साळवी यांनी दिली.
-----
कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार
राज्य शासनाने इंदिरा गांधी रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये १४ परिचारिकांना या रुग्णालयात काम करण्यासाठी नियुक्तीचे पत्र दिले, पण पत्र मिळाल्यानंतर त्या परिचारिका रुग्णालयात काम करण्यासाठी हजर झाल्या नाहीत. त्यामुळे रुग्णांना सेवा देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. असे असताना असलेला कर्मचारी वर्ग तीन शिफ्टचे काम करीत आहे, अशी माहिती प्रसूतिगृहाच्या इन्चार्ज सविता साळवी यांनी दिली.