विसळभोळ्या ५० प्रवाशांच्या रेल्वेचा सुखद धक्का

विसळभोळ्या ५० प्रवाशांच्या रेल्वेचा सुखद धक्का

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : लोकल ट्रेन ही सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. रेल्वे प्रवासात गर्दीच्या वेळी लोकलमधून उतरताना लोकलमध्येच विसरलेली बॅग असो अथवा रेल्वेस्थानकवर गहाळ झालेली बॅग असो. या पुन्हा आपल्याला परत मिळतील याची अपेक्षा धूसर झालेली असते. पण रेल्वे कर्मचाऱ्यांकडून या वस्तूंचा शोध घेत, गेल्या अडीच महिन्यांत रेल्वे प्रवासात गहाळ अथवा विसरलेल्या रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे असणाऱ्या ५० प्रवाशांच्या बॅगा मिळवून देत सुखद धक्का देण्यात येत आहे.
ठाणे रेल्वेस्थानकाची ऐतिहासिक रेल्वेस्थानक अशी ओळख आहे. या रेल्वेस्थानकात दिवसेंदिवस प्रवाशांचा वाढता ताण, यांमुळे होणारी गर्दी, लाखो प्रवाशांची वर्दळ ठाणे रेल्वेस्थानकात सुरू असते. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये चढणे किंवा उतरणे ही तारेवरची कसरत असते. मात्र या कसरतीत काही वेळा जवळची वस्तू रेल्वेत विसरण्याच्या घटना घडतात. स्थानकात लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस थांबत असल्याने या गाड्यांमध्ये वस्तू विसरण्याचे प्रकार घडतात. रेल्वेत राहिलेली वस्तू परत मिळेल का, अशा संभ्रमात असताना, प्रवासी ठाणे रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात तक्रार करतात; परंतु रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अनेक हरवलेल्या वस्तू परत मिळाल्या आहेत. मार्च ते १५ मे या अडीच महिन्यांत सुमारे ५० प्रवाशांना त्यांचा किमती ऐवज परत केला आहे. दरम्यान, रेल्वेतच नव्हे तर मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये राहिलेल्या बॅगेत लाखो रुपयांचे दागिने होते. ही बॅग देखील मूळ मालकाला परत केली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
...............................
पैशाने भरलेली बॅग पुन्हा प्रवाशाला
नुकतीच प्लॅटफॉर्म क्रमांक १० वर वाशी ट्रेनमध्ये एक व्यक्ती सुमारे ७५ हजारांची रोकड असलेली पिशवी विसरून गेली होती. रेल्वे सफाई कर्मचारी यांनी ही बॅग ठाणे रेल्वे व्यवस्थापक केशव तावडे यांच्याकडे आणून दिली. पिशवीत पैसे आणि कागदपत्र होती. पिशवीत कोणताच पुरावा नसताना, पिशवी शोधत स्टेशन मास्टर कार्यालयात आलेल्या प्रवाशाला त्याची पिशवी सुपूर्द केली.
................................................
चिपळूणला रेल्वेत बसून ठाणे स्थानकात उतरल्यावर माझी बॅग रेल्वेत राहिली. बॅगेत दोन मोबाईल, साडेचार हजार रुपये, घड्याळ असा ऐवज होता. बॅग परत मिळेल याची कोणतीच खात्री नव्हती; परंतु स्टेशन मॅनेजर केशव तावडे यांच्या कार्यालयाकडून बॅगेचा शोध घेण्यात आला. माझे सर्व सामान बॅगेत तसेच होते. रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद!
- मीरा जाधव, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com