
काठ्या या लघुपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात
जव्हार (बातमीदार) : ‘काठ्या’ या लघुपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १६) हिरड पाडा येथे करण्यात आली. आदिवासी संस्कृतीत गावापाड्यात ‘काठ्या’ या व्यक्तीला गावप्रमुख म्हणून खूप महत्त्व आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी या लघुपटाची निर्मिती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या लघुपटात गावप्रमुखाची भूमिका पाथर्डी येथील अभिनेता यशवंत तेलम यांनी साकारली आहे. लघुपटासाठी ५१ हजार रुपयांची मदत देणार असल्याचे निकम यांनी जाहीर केले. या वेळी निकम यांच्या हस्ते हिरड पाडा, दाभोसा, वडोली या गावांतील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले. पालघर जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सुरेखा थेतले, जव्हार पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत रंधा, जव्हार तालुका शिवसेना अध्यक्ष विनायक राऊत, गटविकास अधिकारी ईश्वर पवार, सरपंच भारती भोरे आदी उपस्थित होते.