विश्‍व मल्‍लखांब स्‍पर्धेत मुंबईची मुले चमकली

विश्‍व मल्‍लखांब स्‍पर्धेत मुंबईची मुले चमकली

मुंबई, ता. १७ ः विश्व मल्लखांब संघटनेतर्फे ९ ते ११ मेदरम्‍यान आसाम येथे दुसऱ्या विश्व मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या. यामध्ये सुमारे दहा देशांतील १२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये मुंबईतील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई उपनगरमधील श्री पार्लेश्वर व्यायामशाळा विलेपार्ले येथील अक्षय तरळ याने १०७.२४२ गुणांसह वैयक्तिक अजिंक्यपद पटकावले. द्वितीय क्रमांकावर भारताचाच शुभंकर खवळे ८२.३४१ या गुणांसह आला; तर तिसरा क्रमांक अमेरिकेच्या अद्वैत कुलकर्णी याला मिळाला. महिलांमध्येदेखील महाराष्ट्रातील मुंबई उपनगरमधील श्री पार्लेश्वर व्यायामशाळा विलेपार्ले येथील खेळाडू जान्हवी जाधव हिला ८८.०६७ गुणांसह वैयक्तिक अजिंक्यपदाचे सुवर्णपदक मिळाले. दुसरा क्रमांक ६८.२९१ गुणांसह मुंबईच्याच रूपाली गंगावणे हिचा आला; तर अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणारी ऋचा कुलकर्णी हिला ५४.११७ गुणांसह कांस्यपदक मिळाले.

भारताचे पुरुष व महिला संघ अव्वल
भारतीय संघनायक चंद्रशेखर चौहान, अक्षय तरळ, एम. हेमचंद्र, शुभंकर खवळे, संतोष शोरी आणि पंकज गार्गमा यांच्या पुरुष संघाने २६२.१९९ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला; तर दुसऱ्या क्रमांकावर गुणांसह अमेरिका व तृतीय क्रमांकावर नेपाळ संघ होता. रूपाली गंगावणे, जान्हवी जाधव, जेसिका प्रजापती, अंजली यादव, संतय पोटय आणि जयंती कचलाम यांच्या महिला भारतीय संघाला अपेक्षेप्रमाणे पुरलेला आणि दोरी मल्लखांब या दोन्ही प्रकारांमध्ये २१४.१८३ गुणांसह सांघिक सुवर्णपदक मिळाले. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचा संघ आला; तर तृतीय क्रमांक नेपाळ संघाला मिळाला.

अक्षयने पटकावले पाच सुवर्ण, एक रौप्य
अक्षय तरळला सांघिक सुवर्णपदक, वैयक्तिक सुवर्णपदक, पुरलेल्या मल्लखांबातला छोटा संच व मोठा संच या दोघांतही सुवर्णपदक, दोरी मल्लखांबातील मोठ्या संचातील सुवर्णपदक आणि छोट्या संचातील रौप्यपदक अशी पाच सुवर्ण आणि एक रौप्य अशी सहा पदके मिळाली आहेत.

जान्हवीचीही सुवर्ण कामगिरी
जान्हवी जाधवला सांघिक सुवर्णपदक, वैयक्तिक सुवर्णपदकासह दोन्ही मल्लखांबातली दोनही सुवर्णपदके आणि पुरलेल्या मल्लखांबातील मोठ्या संचातील सुवर्णपदक व छोट्या संचातील रौप्य पदक अशी सहा पदके मिळाली आहेत. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना मिळून पार्लेश्वर व्यायामशाळेकडे दहा सुवर्ण आणि दोन रौप्य अशी बारा पदके आलेली आहेत.

पार्लेश्‍वर व्यायामशाळेचे यश
मल्लखांब या अस्सल भारतीय पारंपरिक खेळाची ही दुसरी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे. या स्‍पर्धेत भारतीय संघाने मिळवलेल्‍या यशात मुंबईतील पार्लेश्‍वर व्यायामशाळेचे मोळे योगदान आहे. यंदाच्या या स्‍पर्धेत १० सुवर्ण व दोन रौप्य पदके या शाळेच्या खेळाडूंनी पटकावली असून याचे श्रेय व्यायामशाळेचे प्रमुख प्रशिक्षक गणेश देवरुखकर, ईशा देवरुखकर आणि मार्गदर्शक महेश आटळे यांचे असल्‍याचे खेळाडूंनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com