
मुलुंडनंतर गोरेगाव येथे अल्पवयीन मुलीचा मृत्यू
गोरेगाव येथे अल्पवयीन मुलीचा मृत्यू
कारमालकाविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल
अंधेरी, ता. १७ (बातमीदार) ः मुलुंड येथे एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूची घटना नुकतीच घडलेली असतानाच आता गोरेगाव येथे अन्य एका सोळा वर्षांच्या मुलीचा अपघातात मृत्यू झाला आहे. इसमित असे या मृत मुलीचे नाव असून तिच्या मृत्यूप्रकरणी कारचालक असलेल्या मोहम्मद अली जियाउद्दीन महारुप याच्याविरुद्ध आरे पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविला आहे.
अंधेरी येथील मोहम्मद अलीने त्याच्या मालकीची कार एका अल्पवयीन नातेवाईक मुलाकडे दिली होती. या कारमधून तो मुलगा त्याची मैत्रिण इसमितसोबत १५ मे रोजी गोरेगाव येथील रॉयल पंपच्या दिशेने जात होता. या वेळी भरवेगात कार चालविताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारची धडक दुभाजकाला बसली. या अपघातात इसमित ही गंभीररीत्या जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी जतिनदर दलवीर सिंग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोहम्मद अली महारुप याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गाडी चावणारा सोळा वर्षांचा अल्पवयीन असताना, त्याच्याकडे वाहन चालविण्याचा कुठलाही परवाना नसताना मोहम्मद अलीने त्याला त्याची कार चालविण्यास दिली होती. त्यातून हा अपघात होऊन एका सोळा वर्षांच्या मुलीला आपले प्राण गमवावे लागले होते. अशीच दुसरी घटना मुलुंड येथे घडली. अल्पवयीन मुलीला स्कुटी चालविण्यास दिल्यानंतर या स्कुटीचा अपघात होऊन दिशा या बारा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नवघर पोलिसांनी स्कुटी चालविण्यास दिलेल्या मैत्रिणीच्या पित्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.