महाराष्ट्रातील चित्रपट-रंगभूमीचा ‘कान’ महोत्सवात सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रातील चित्रपट-रंगभूमीचा ‘कान’ महोत्सवात सन्मान
महाराष्ट्रातील चित्रपट-रंगभूमीचा ‘कान’ महोत्सवात सन्मान

महाराष्ट्रातील चित्रपट-रंगभूमीचा ‘कान’ महोत्सवात सन्मान

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : फ्रान्समध्ये नुकत्याच सुरू झालेल्या ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागात महाराष्ट्र सरकारच्या वतीने सिनेमा, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा आकर्षक स्टाॅल उभारण्यात आला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरगन यांनी नुकतीच स्टॉलला भेट दिली. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी त्यांचे स्वागत केले.

यंदा महोत्सवाच्या बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित ‘या गोष्टीला नावच नाही’, सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित ‘टेरिटेरी’ आणि मंगेश बदर दिग्दर्शित ‘मदार’ सिनेमांची निवड करण्यात आली. तिन्ही चित्रपटांचे प्रतिनिधी ‘कान’मध्ये उपस्थित आहेत. निवडण्यात आलेल्या चित्रपटांना जागतिक बाजारपेठ मिळावी, चित्रपटांचे वितरण व्हावे, यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.
‘सिंहासन’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांसारख्या अजरामर चित्रपटांचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी महामंडळाच्या स्टाॅलला भेट देऊन कौतुक केले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी देश-विदेशातील चित्रपट समीक्षक, निर्माते, दिग्दर्शक, सिने-पत्रकार, कलाकार, चित्रपटरसिक आदी मंडळींनी स्टाॅलला भेट दिली.

परिसंवादामध्ये सहभाग
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळातर्फे महोत्सवात ‘इंडिया ः द कम्प्लिट फिल्मिंग डेस्टिनेशन’ या विषयावरील परिसंवाद आयोजित केला होता. त्यात सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी सहभाग घेतला.