जिल्हा ग्राहक आयोगाचा कारभार ठाण्यातूनच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा ग्राहक आयोगाचा कारभार ठाण्यातूनच
जिल्हा ग्राहक आयोगाचा कारभार ठाण्यातूनच

जिल्हा ग्राहक आयोगाचा कारभार ठाण्यातूनच

sakal_logo
By

पालघर, ता. १८ (बातमीदार) : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कार्यालय पालघरमध्ये सुरू करण्यात आलेले नाही. आजही या कार्यालयाचा कारभार ठाणे जिल्ह्यातून सुरू असल्याने पालघर जिल्ह्यातील नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. या कार्यालयासाठी पालघरमध्ये जागा उपलब्ध असल्याने हे कार्यालय जिल्ह्यात त्वरित सुरू करावे आणि नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. दत्ता आदोडे यांनी पालकमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेला ग्राहक तक्रार निवारण आयोग अद्याप ठाणे जिल्ह्यात आहे. तसेच या कार्यालयाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. त्याचा पदभार हा नाशिक ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्षांकडे आहे. या कार्यालयात पालघर जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारी गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. पालघर जिल्हा कार्यालयात प्रशासकीय भवन बी येथे कार्यालयाकरिता खोली नंबर १०१ मध्ये ग्राहक तक्रार निवारण कार्यालयासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तरीही हे कार्यालय पालघरमध्ये सुरू करण्यास प्रशासनाकडून चालढकल करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे ग्राहक संरक्षण खाते असून पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी, या विषयाकडे लक्ष घालून हे कार्यालय पालघरमध्ये त्वरित सुरू करावे, अशी मागणी आदोडे यांनी केली.