
गोराईतील संत निरंकारी मार्गाची दुरवस्था
कांदिवली, ता. १८ (बातमीदार) ः गोराई येथील संत निरंकारी या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी उंच-सखल भाग तयार झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना त्याचा अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत पालिकेने त्वरित कार्यवाही करण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
संत निरंकारी मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. अशातच येथील चांदगंगा सोसायटीसमोर एक मोठा खड्डा पडला आहे. वेळीच त्याची डागडुजी न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच रस्त्यावर इतर ठिकाणी उंच-सखल भाग तयार झाल्याने पालिकेने त्वरित याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे या भागात डांबरीकरण व पेव्हर ब्लॉक्सने डागडुजी करण्यात आली होती. मात्र सध्या पॅचवर्कमुळे मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. खड्डे, उंच-सखल भाग आणि भेगा यामुळे प्रवाशांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
संत निरंकारी या मुख्य मार्गावरील खड्डे, भेगा आणि खचलेले पेव्हर ब्लॉक्स यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने पालिकेने तातडीने लक्ष घालून मार्गाची दुरुस्ती करावी.
- अजित डोंगरे, अध्यक्ष, आम्ही पुणेकर रहिवासी संघ
संत निरंकारी मार्गावरील पेव्हर ब्लॉक्सची तातडीने डागडुजी करण्यास ठेकेदारास सूचना दिलेल्या आहेत. लवकरच रस्ता दुरुस्त करण्यात येईल.
- एस. ठाकरे, अभियंता