सोनसाखळी चोरांशी पोलिसांची चकमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनसाखळी चोरांशी पोलिसांची चकमक
सोनसाखळी चोरांशी पोलिसांची चकमक

सोनसाखळी चोरांशी पोलिसांची चकमक

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : ऐरोली परिसरात एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पळणाऱ्या दोघांपैकी एकाला रबाळे पोलिसांच्या ॲन्टी चेन स्नॅचिंग पथकाने पकडले आहे. यावेळी या लुटारूंनी पोलिसांवर चाकूने हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिल्मी स्टाईलने पोलिसांनी पाठलाग करत दोघांपैकी एकाला अटक केली.
कल्याण परिसरात राहणारे मुसा अनु सय्यद (२९) आणि हसन अयुब सय्यद इराणी (२२) रविवारी (ता. १४) रात्री ८.३० च्या सुमारास ऐरोली सेक्टर-८ मधील अॅपल हॉस्पिटलजवळ एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून ऐरोली मुलुंड मार्गाच्या दिशेने पळाले होते. हा प्रकार ऐरोली भागात गस्तीवर असलेल्या रबाळे पोलिस ठाण्यातील ॲन्टी चेन स्नॅचिंग पथकाला मिळाली होती. या वेळी पथकाने तत्काळ या लुटारूंचा मोटरसायकलने पाठलाग सुरू केला. त्यामुळे सदर लुटारूंनी पोलिसांना पाहून पदपथावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिस उपनिरीक्षक वणवे यांनी मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या मुसा सय्यद याला पकडण्याचा प्रयत्न केला. दोघा लुटारूंनी पोलिसांसोबत झटापट सुरू केली. या वेळी हसन इराणी याने फायटरसदृश वस्तूने पोलिसांवर हल्ला केला; तर मुसा सय्यद याने चाकू काढून पोलिस उपनिरीक्षक वणवे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला होता.
----------------------------------------------------------
चोरीच्या दुचाकींचा वापर
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलचा वापर चोरीसाठी केला जात होता. या वेळी पोलिसांनी जप्त केलेली मोटारसायकल उल्हासनगरमधील श्रीराम चौकातून चोरल्याचे तसेच त्याबाबत विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या चोरलेल्या मोटरसायकलवरून त्यांनी सोनसाखळी चोरीचे अनेक गुन्हे केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
---------------------------------------------
पोलिसांची साध्या वेशात गस्त
ऐरोली तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अशा कारवाया जेरबंद करण्याचे आदेश रबाळे पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक दुलाबा ढाकणे यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी, अंमलदार हे दररोज आपल्या हद्दीत पोलिस गणवेशात तसेच साध्या वेशात गस्त घालत आहेत.