
अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव शनिवारी रंगणार
अंबरनाथ, ता. १८ (बातमीदार) : अंबर भरारी, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांचा आठवा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (ता. २०) रंगणार आहे. या सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
सात वर्षांपासून अंबरनाथमध्ये मराठी चित्रपट महोत्सवाचे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले जाते. यंदाच्या चित्रपट महोत्सवासाठी ४० मराठी चित्रपट नामांकनासाठी दाखल झाले होते. त्यातून ताठ कणा, समायरा, पिकासो, अनुभूती, आय एम सॉरी, येरे येरे पावसा, भीरकिट, शेर शिवराज है, गडद अंधार या चित्रपटांमध्ये विविध विभागांमध्ये चुरस आहे. अभिनेते गिरीश कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, चिन्मय मांडलेकर, उमेश कामत, प्रणव रावराणे यांना अभिनयातील विविध विभागांसाठी नामांकन प्राप्त झाले आहे. अभिनेत्रींमध्ये नेहा महाजन, मोनालिसा बागल, स्वानंदी बेर्डे, रिंकू राजगुरू, रूपाली भोसले, दीप्ती देवी यांना नामांकन मिळाले आहे. घोषित पुरस्कारांमध्ये प्रसाद ओक, वर्षा उसगावकर, पौर्णिमा अहिरे, केतकी नारायण यांचा समावेश आहे.
हा सोहळा शनिवारी सायंकाळी ७ वाजता अंबरनाथ पूर्वेस असलेल्या गावदेवी मैदानात रंगणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, दिगदर्शक राजदत्त, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ होणार असल्याची माहिती अंबर भरारीचे संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक सुनील चौधरी यांनी दिली.
विविध पुरस्कारांची मेजवानी
यंदा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना कारकिर्द सन्मान पुरस्कार, सुप्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांना कारकिर्द गौरव पुरस्कार, नंदकुमार पाटील यांना सिनेपत्रकारिता गौरव पुरस्कार, तर प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना कुटुंब योगदान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.