कोपरीत दुषित पाण्याच्या पुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरीत दुषित पाण्याच्या पुरवठा
कोपरीत दुषित पाण्याच्या पुरवठा

कोपरीत दुषित पाण्याच्या पुरवठा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे पूर्व येथील धोबी घाट परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील कोपरी परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी संध्याकाळी फुटल्याची घटना घडली. या घटनेनंतर पाणीपुरवठा विभागाकडून या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. तसेच बुधवारी सकाळपासून परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केला आहे. असे असले तरी दुसरीकडे दुरुस्तीच्या कामानंतर काही भागांत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे कोपरीवासीय हैराण झाले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
ठाणे पूर्व येथील कोपरी परिसरातील धोबीघाट येथे असलेल्या पाण्याच्या टाकीतून काही भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशातच या पाण्याच्या टाकीतून परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी संध्याकाळी फुटली. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळतात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या कामामुळे १२ तासांहून अधिक काळ कोपरी परिसराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, पाण्याच्या टाकीच्या बाजूलाच एका बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. जलकुंभ आणि बांधकाम प्रकल्पाची संरक्षक भिंत एकच आहे. या भिंतीखालूनच परिसराला पाणीपुरवठा करणारी ५०० मी. मी. व्यासाची जलवाहिनी जाते. दोन महिन्यांपूर्वीदेखील या जलवाहिनीला धक्का लागल्याने फुटल्याची घटना घडली होती. त्यात मंगळवारी पुन्हा याच भागात जलवाहिनी फुटल्याची घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
.....

सांध्याजवळून पाणीगळती
संरक्षक भिंतीजवळील कामामुळे जलवाहिनीवरील माती निघून गेली होती. या जलवाहिनीच्या सांध्याजवळ पाण्याची गळती होत होती. त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते; परंतु पाणीपुरवठा सुरू होताच त्याच्या दाबामुळे जलवाहिनी सांध्यातून निखळली, असा दावा महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत पालव यांनी केला आहे.
...........................
माती शिरल्याने दूषित पाणी
जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, काही भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. घरातील नळांमध्ये येणारे पाणी गढूळ असून त्याला गटाराच्या पाण्यासारखी दुर्गंधी येत आहे. अशा तक्रारी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहेत. दरम्यान, जलवाहिनी फुटल्यानंतर त्यात माती शिरल्यामुळे काही भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असावा, अशी शक्यता पालिका प्रशासनाने व्यक्त केली.