Mumbai : मोबाईल, कोरेक्स बॉटलचा साठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
मोबाईल, कोरेक्स बॉटलचा साठा जप्त

Mumbai : मोबाईल, कोरेक्स बॉटलचा साठा जप्त

कळवा - नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या ५०२ कफ सिरपच्या बॉटल तसेच महागडे मोबाईल जप्त करण्यात आल्याची कारवाई मुंब्रा पोलिसांनी केली. या प्रकरणी फय्याज फरीद शेख (वय २४), मोहमद अन्सारी (वय २१), मोह्यमद शोयब सलीम शेख (वय २१), फैसल शेख (वय २०) व मोहमद शेख (वय ३२) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नऊ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंब्रा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कृपली बोरसे यांनी मुंब्रा येथील रशीद कपाऊंडमधील रिजवान चाळीमध्ये धाड टाकली.

चाळीतील दोन नंबरच्या खोलीतील बेडरूममध्ये साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी धाड टाकून वेगवेगळ्या कंपनीचे चोरीचे ६२ मोबाईल व मॅक्सकॉफ कंपनीचे नशा येणारे ५०२ कफ सिरप बॉटल हस्तगत करण्यात आल्या. या वेळी फय्याज फरीद शेख व त्याचा साथीदार मोह्ममद शोयब सलीम शेख यांना ताब्यात घेण्यात आले.

साथीदारांकडून लॅपटॉप जप्त
दोघांना गुन्ह्यात मदत करणारे व मोबाईल दुरुस्तीचे काम करणारे मोहमद अन्सारी, फैसल शेख व मोहमद शेख यांनाही मुंब्रा पोलिसांनी अटक केली व त्यांच्याकडून एक लॅपटॉप व सॉफ्टवेअर जप्त करण्यात आले. यामधील दोन्ही मुख्य आरोपींवर ठाणे, मुंब्रा, कुर्ला व रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून ते सराईत गुन्हेगार आहेत,

अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली. अप्पर पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाने ही कारवाई केली.