
द्रोणागिरी समुद्धीच्या वाटेवर
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ ः दक्षिण नवी मुंबईतील खारघर, तळोजा, उलवे या नोडमध्ये सिडकोतर्फे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे नवी मुंबईला जागतिक स्तरावर मानाचे स्थान प्राप्त होणार आहे. या नोडबरोबरच नवी मुंबईच्या दक्षिण टोकाकडील द्रोणागिरी नोडलाही महत्त्व आले आहे. कारण पौराणिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या द्रोणगिरी परिसरात रेल्वे, महामार्ग, मेट्रोमुळे दळणवळणाची सुविधा उपलब्ध असून सिडकोच्या परवडणाऱ्या दरातील घरांमुळे रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.
नवी मुंबईच्या दक्षिणेकडील झपाट्याने विकसित होणारा नोड म्हणून द्रोणागिरी नोड उदयास आला आहे. रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील हा नोड नजीकच्या भविष्यात उद्योग, व्यवसायांच्या वाढीसह परिवहन सुविधांनीही समृद्ध बनणार आहे. जेएनपीटी बंदराशी असलेल्या सान्निध्यामुळे बंदरावर आधारित उपक्रमांसाठी हा नोड सिडकोतर्फे विकसित करण्यात आला आहे. जेएनपीटी (न्हावा शेवा) बंदरालगत असल्याने द्रोणागिरी नोडला एक वेगळेच महत्त्व आले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर असलेल्या जेएनपीटीमुळे बंदरावर आधारित (पोर्ट बेस्ड) उद्योग इथे मोठ्या प्रमाणावर येणार आहेत. त्यामुळे सिडकोतर्फे द्रोणागिरी व नजीकच्या नोडमध्ये नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र (नवी मुंबई सेझ) आणि इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स पार्क (आयएलपी) प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत.
------------------------------------
दळणवळणाच्या सर्वोत्तम सुविधा
- द्रोणागिरी नोड हा परिवहनाच्या विविध सुविधांनी परिपूर्ण आहे. सिडकोतर्फे उलवे नोडमध्ये साकारण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे द्रोणागिरी नोडपासून जवळ आहे. दहा पदरी राज्य महामार्ग १०३ द्वारे द्रोणागिरी नोडला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबर जोडण्यात आले आहे. तसेच द्रोणागिरी नोडला दहा पदरी राष्ट्रीय महामार्ग-४ बी द्वारे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाबरोबर जोडले गेले आहे.
- सिडकोतर्फे विकसित केलेल्या नेरूळ-उरण उपनगरीय रेल्वे मार्गावरील द्रोणागिरी स्थानकामुळे या परिसराला विशेष महत्त्व येणार आहे. सिडकोच्या मेट्रो प्रकल्पातील नियोजित खारघर स्थानक हे द्रोणागिरी नोडला जवळचे मेट्रो स्थानक असणार आहे. तसेच लवकरच पूर्णत्वास येणाऱ्या मुंबई-पारबंदर मार्गावरील चिर्ले आणि जासई आंतरबदलद्वारे द्रोणागिरी परिसरात दळणवळणाची उत्तम सुविधा सुरू होणार आहे.
- सिडकोतर्फे विकसित केलेला नवघर ते द्रोणागिरी हा ५.४ कि.मी.चा किनारी मार्ग हा खोपटा येथे बाह्यवळण मार्गाचे काम करीत असल्याने द्रोणागिरी नोडमधील ट्रक व अवजड वाहतुकीची रहदारी कमी झाली आहे. तसेच द्रोणागिरी परिसरातील सध्या अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांना व प्रस्तावित नवी मुंबई सेझ, जेएनपीटी, सीएफएस इत्यादी प्रकल्पांकरिता थेट प्रवेश मार्ग म्हणून या मार्गाचे महत्त्व आहे.
- एमएसआरडीसीतर्फे करंजा ते रेवसदरम्यान उभारण्यात येणाऱ्या ९ किमी लांबीच्या रस्त्यामुळे अलिबाग ते मुंबई दरम्यानची वाहतूक सुरळीत चालण्यास मदत होणार आहे. सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या १.२ किमी लांबीच्या उरण बाह्यवळण मार्गामुळे एनएडी करंजाकडे येणाऱ्या दैनंदिन प्रवासी, तसेच उरण शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
----------------------
गृहप्रकल्पांमुळे गुंतवणुकीसाठी उत्तम
गृहनिर्माण योजनांमधील प्रधानमंत्री आवास योजनेतील अनेक गृहसंकुलांचे बांधकाम सिडकोकडून द्रोणागिरी नोडमध्ये करण्यात आले आहे. यामुळे हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांना परवडणाऱ्या दरातील घरांचा पर्यायही येथे उपलब्ध झाला आहे. तसेच परिवहन केंद्रीत विकास संकल्पनेवर आधारित करण्यात आलेल्या गृहसंकुलांच्या निर्मितीमुळे द्रोणागिरी नोड घर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे.
---------------------------
द्रोणागिरी नोडला सिडकोतर्फे उपनगरीय रेल्वे, किनारी मार्ग प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. तसेच या नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होणाऱ्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिडकोच्या परवडणाऱ्या घरांचे बांधकामही सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नवी मुंबईतील वास्तव्यासाठी द्रोणागिरी नोडलाही नागरिकांकडून अधिक प्राधान्य दिले जाणार आहे.
- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको