चारचाकी चोरणारी सराईत चौकडी अटकेत

चारचाकी चोरणारी सराईत चौकडी अटकेत

नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : चोरीच्या वाहनांवर इन्शुरन्स कंपनीकडून विकत घेतलेल्या अपघातग्रस्त वाहनांचे चेसिस, इंजिन नंबर छापून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीतील चौकडीला गुन्हे शाखा कक्ष-१ च्या पथकाने अटक केली आहे. या चौकडीने नवी मुंबई व मुंबई परिसरातून चोरलेल्या तब्बल ७० लाख रुपये किमतीची १३ वाहने हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या टोळीने केलेले १५ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या टोळीकडून आणखी काही वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मोटारकार चोरीचे प्रमाण वाढल्याने वाहनचोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस आयुक्त मिलिंद भांरबे व सहपोलिस आयुक्त संजय मोहिते यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा, कक्ष-१ च्या अधिकारी व अंमलदारांनी या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला होता.
माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक हर्षल कदम व त्यांच्या पथकाने खारघर परिसरात सापळा लावून मोहम्मद अरशद अमजद अली खान (वय २७) व अख्तर अमजद अली खान (वय २५) या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेने त्यांची चौकशी केली असता, त्यांनी इतर सहकाऱ्यांच्‍या मदतीने डिसेंबर २०२२ मध्ये तसेच त्यापूर्वी नवी मुंबई पसिरात मोटारकार चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर गुन्हे शाखेने त्यांनी दिलेल्या माहितीवरून झाहीद अख्तर अन्सारी (वय ३०) व अब्दुल माजी मुसाभाई (वय ४२) यांनादेखील अटक केली. या चौकडीच्या चौकशीत त्यांनी नवी मुंबई व मुंबई परिसरातून १५ मोटारकार चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने त्यांच्याकडे सखोल चौकशी करून तब्बल ७० लाख रुपये किमतीच्या १३ मोटारकार हस्तगत केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com