घरपट्टी गैरव्यवहारप्रकरणी कर अधीक्षकाचे निलंबन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरपट्टी गैरव्यवहारप्रकरणी कर अधीक्षकाचे निलंबन
घरपट्टी गैरव्यवहारप्रकरणी कर अधीक्षकाचे निलंबन

घरपट्टी गैरव्यवहारप्रकरणी कर अधीक्षकाचे निलंबन

sakal_logo
By

विरार, ता. १८ (बातमीदार) : पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या स्वरूपात सामान्य नागरिकाकडून जमा झालेले पैसे परस्पर बाजारात व्याजाने व अन्य ठिकाणी फिरवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तांनी या प्रकरणी संबंधित कर अधीक्षकाला निलंबित केले आहे. ‘सी’ घरपट्टी विभागातील तब्बल ७२ लाख ६८ हजार ८९९ रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी काल संध्याकाळी त्याचे निलंबन करण्यात आले.
अरुण जानी असे निलंबन केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून घरपट्टी-पाणीपट्टी स्वरूपात जमा झालेली रक्कम ते बाजारात व्याजाने व अन्य व्यवहारात फिरवत असल्याचा त्यांच्यावर संशय होता. वसईतील पर्यावरण अभ्यासक चरण भट यांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. भट यांच्या तक्रारीची दखल घेत आयुक्त अनिलकुमार पवार यांनी संबंधित विभागाकडून चौकशी अहवाल मागवला होता. चौकशीअंती कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले होते.

अनिलकुमार पवार यांना मिळालेल्या चौकशी अहवालात अरुण जानी यांनी १८ एप्रिल ते १६ मे २०२३ दरम्यान जमा झालेला ७२ लाख ६८ हजार ८९९ लाखांचा कर पालिकेत भरणा केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. आपल्या कृत्याची कुणकुण लागताच जानी यांनी बुधवारी दुपारी तातडीने २६ लाख २२ हजार ६६० रुपये पालिकेत भरणा केल्याचे समजते. उर्वरित ४६ लाख ४७ हजार २३९ रुपयांची रक्कम अद्याप भरण्यात आलेली नाही. जानी यांचे हे कृत्य आर्थिक अपहाराचे असून महाराष्ट्र महापालिका नागरी सेवा (वर्तणूक) अधिनियम १९७९ चे कलम ३ चा भंग करणारे असल्याचा ठपका ठेवत आयुक्त पवार यांनी त्यांना निलंबित केले.

घरपट्टी व पाणीपट्टीचे पैसे व्याजाने देण्याच्या प्रकरणात अन्य कर्मचाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गैरव्यवहारात सहभागी सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जावे.
- चरण भट, पर्यावरण अभ्यासक