जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्थलांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्थलांतर
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्थलांतर

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्थलांतर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर होणार आहे. त्यानुसार रुग्णालयाची जुनी इमारत पाडून पाया खोदण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या शेजारील आरोग्य विभागाच्या जागेत जिल्हा रुग्णालय तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले असून येत्या आठवड्याभरात या ठिकाणी बाह्यरुग्ण (ओपीडी) कक्ष रुग्णांच्या सेवेसाठी खुला होणार आहे.
ठाणे जिल्हा रुग्णालयात खासगी रुग्णालयाच्या तोडीस तोड सेवा देण्याचा प्रयत्न नेहमी करण्यात येत आहे. अशातच आता विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालय कात टाकत आहे. ते रुग्णालय पाडून त्याच ठिकाणी ९०० बेड्सचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहत आहे. यामध्ये ५०० बेड्सचे जिल्हा रुग्णालय, प्रत्येकी २०० बेड्सचे सेवा आणि महिला व बाल रुग्णालय असणार आहे. मध्यंतरी या जीर्ण झालेल्या इमारती पाडून तेथे नवे रुग्णालय उभारण्याची शासनाने परवानगी दिली असून आता त्याचे पाडकाम हाती घेण्यात आलेले आहे. त्यामुळे येथे असलेल्या विविध विभागांचे इतरत्र स्थलांतर करण्यात आले आहे. आता संपूर्ण जिल्हा रुग्णालय मनोरुग्णालयाच्या जवळील आरोग्य विभागाच्या जागेत हलवण्यात आले आहे. रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

...................
रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, या हेतूने स्थलांतरित केलेल्या जिल्हा रुग्णालयात उत्तम सोयीसुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पुढच्या आठवड्यात बाह्यरुग्ण (ओपीडी) कक्ष खुला करण्याचा मानस आरोग्य प्रशासनाचा आहे. बाह्यरुग्ण विभागात एकाच ठिकाणी वैद्यकीय अधिकारी रुग्णांना सेवा देतील, अशा पद्धतीने कक्ष बांधला आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे