
मुंबईकरांचा सेवेत दोन रो-रो बोटी!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : भाऊचा धक्का ते मांडवादरम्यानच्या सेवेनंतर आता मुंबईकरांसाठी आणखी दोन रो-रो बोटी दाखल होणार आहेत. मुंबई ते काशीद आणि मुंबई ते दिघीदरम्यान रो-रो बोटी धावणार आहेत. सध्या काशीद जेटीचे काम सुरू आहे. मुंबई ते दिघीदरम्यान रो-रो बोट सुरू करण्यासाठी सागरी महामंडळाने राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती सागरी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सागरमाला उपक्रमांतर्गत कोकणातील समुद्रकिनाऱ्यांचा उपयोग करून जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी विविध जलमार्गांचे काम सागरी महामंडळाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान रो-रो बोट सुरू झाली आहे. परिणामी वाहतुकीसाठी होणारा खर्च आणि वेळही वाचत असल्याने दिवसेंदिवस कोकणातील पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यांच्या सोयीसाठी मुंबई ते काशीद आणि मुंबई ते दिघी बंदरादरम्यान रो-रो बोट सुरू करण्यात येणार आहे.
काम प्रगतिपथावर
मुंबई ते काशीददरम्यान दुसरी रो-रो बोट धावणार आहेत. त्यासाठी काशीद बंदरावर जेटी उभारण्यात येत आहे. त्या कामासाठी ११२ कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. दुसरीकडे गोव्यात दुसरी रो-रो बोट बांधण्याचे काम सुरू आहे. तीसुद्धा दिवाळीपर्यंत बांधून पूर्ण होणार आहे. यंदाच्या वर्षअखेरीस मुंबई ते काशीददरम्यान रो-रो बोट धावणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.
लवकरच मंजुरी
- मुंबईकरांना तिसरी रो-रो बोटही मिळणार आहे. दिघी ते मुंबई रो-रो बोट सेवा सुरू करण्यासाठी सागरी महामंडळाने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.
- विशेष म्हणजे, महामंडळाने मुंबई ते दिघीदरम्यान रो-रो बोट चालविण्यासाठी एका खासगी कंपनीशी चर्चाही सुरू केली आहे.
- रो-रो बोटी निश्चितही करण्यात आल्या आहेत. २६० प्रवासी आणि २० वाहने घेऊन जाण्याची त्यांची क्षमता आहे. मुंबई ते दिघी अंतर अवघ्या पावणेतीन तासांत पूर्ण करता येणार आहे.