
सिडको मुख्यालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : सिडकोच्या तळोजा येथील गृह प्रकल्पात मिळालेल्या इमारतीच्या तळ मजल्यावरील सदनिका बदलून देण्याच्या मागणीसाठी एका अपंग महिलेने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (ता. १८) घडली. सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनमध्ये गेलेल्या नलिनी घाडगे या महिलेने सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; मात्र सिडकोतील सुरक्षा रक्षकांनी तिला वेळीच पकडून तिचा प्रयत्न हाणून पाडला.
नलिनी घाडगे हिचे पती अपंग असल्याने त्यांना सिडकोच्या तळोजा येथील गृह प्रकल्पात अपंगांसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातून तळ मजल्यावरील सदनिका देण्यात आली आहे. मात्र खोलीजवळ मीटर रूम असल्याने व इतर असुविधा असल्याने नलिनी घाडगे हिच्या पतीला येण्या-जाण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे आपल्याला पहिल्या मजल्यावरील खोली बदलून देण्यात यावी, अशी मागणी नलिनी घाडगे हिने सिडकोच्या वसाहत विभागात केली होती. सिडकोकडून त्यांच्या मागणीची दखल घेतली न गेल्यामुळे गुरुवारी ती सिडकोच्या मुख्यालयात सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्या दालनात गेली होती. या वेळी कैलास शिंदे यांनी महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु नलिनी घाडगेने आत्महत्या करण्याची धमकी देऊन सोबत आणलेल्या फिनेलची बाटली तोंडाला लावली. याचवेळी सिडकोतील सुरक्षा रक्षकांनी तिला पकडले. त्यामुळे तिला काहीच करता आले नाही. सीबीडी पोलिसांनी या महिलेचा जबाब नोंदवून तिला सोडून दिले आहे.