वानखेडेंना सोमवारपर्यंत अटक करू नका!

वानखेडेंना सोमवारपर्यंत अटक करू नका!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १९ : शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या अटकेप्रकरणी अडचणीत आलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. येत्या सोमवारपर्यंत (ता. २२) वानखेडे यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने शुक्रवारी (ता. १९) दिले.

दोन वर्षांपूर्वी घडलेल्या क्रूझ प्रकरणात वानखेडे यांनी आर्यनसह काही जणांना अटक केली होती; मात्र आर्यनसह आणखी काही जणांना सोडण्यासाठी वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची लाच मागितली, अशी फौजदारी तक्रार सीबीआयकडे केली आहे. यामध्ये वानखेडेंवर त्यांच्याच विभागाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये अटक होण्याच्या शक्यतेने वानखेडे यांनी तातडीने आज ॲड. रिजवान मर्चंट यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

सुट्टीकालीन न्यायालयात न्या. शर्मिला देशमुख आणि न्या. अरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत कलम १७ अ नुसार प्रथम आरोपीची चौकशी करणे बंधनकारक आहे. २०२१ मध्ये घडलेल्या प्रकरणाबाबत चार महिन्यांत चौकशी होणे आवश्यक असल्याची तरतूद आहे. त्यामुळे तूर्तास (सोमवारपर्यंत) वानखेडे यांच्यावर अटकेसह कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले.

दरम्यान, उद्या (ता. २०) सकाळी ११ वाजता सीबीआयच्या बीकेसी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावणार असल्याची हमी वानखेडे यांच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. समीर वानखेडे यांच्यावर केंद्र सरकारच्या परवानगीने गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांनी रीतसर सत्र न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामीन घ्यावा, असा युक्तिवाद सीबीआयच्या वतीने करण्यात आला. सोमवारी एनसीबीच्या वतीने न्यायालयात भूमिका मांडण्यात येणार आहे. दिल्ली न्यायालयातदेखील याप्रकरणी याचिका दाखल आहे.

सीबीआयचा याचिकेला विरोध
माझ्यावर झालेली कारवाई सूडबुद्धीने सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावयावर कारवाई केल्यामुळे माझ्यावर आरोप केले आहेत, असा दावा वानखेडे यांच्या वतीने करण्यात आला; तर सीबीआयने या याचिकेलाच विरोध केला. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणात तेव्हा चार महिन्यांत चौकशी झाली होती. आता चौकशी का केली जाते, असा सवाल करण्यात आला. तसेच शाहरुख खानसह अन्य काहींच्या चॅट आणि फोनचा उल्लेख याचिकेत वानखेडे यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com