
मुख्य आरोपी के. पी. गोसावीच!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : आर्यन खान प्रकरणात सध्या समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने कारवाई केली आहे. आर्यनला अटक झाल्यानंतर एनसीबीच्या पंचनाम्यात प्रभाकर साईलने पंच म्हणून स्वाक्षरी केली होती. काही दिवसात साईलने ‘यू टर्न’ घेत या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले. साईल हा के. पी. गोसावीचा बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर होता; परंतु या प्रकरणाचा ‘व्हीसलब्लोअर’ तोच ठरला. प्रभाकरचे वकील ॲड. हेमंत इंगळे यांच्या मतानुसार या प्रकरणात गोसावी हा मुख्य आरोपी आहे. यात प्रभाकरचा रोल फक्त गोसावीचा ड्रायव्हर एवढाच मर्यादित असल्याचे अॅड. इंगळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
क्रूझवर कारवाई केल्यानंतर आर्यनला एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले. तेथे प्रभाकरला पंच बनवण्यात आले होते; परंतु पंचनामा करण्याआधीच साईलची कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेण्यात आली. या पूर्ण प्रकरणात प्रभाकरचा रोल फक्त गोसावीच्या ड्रायव्हर पुरताच मर्यादित होता. प्रभाकर आणि वानखेडे यांच्यात थेट संपर्क नव्हता; परंतु वानखेडे आणि गोसावी यांच्यात कनेक्शन होते. तसेच प्रभाकर हा गोसावी याच्या निर्देशात काम करत होता. या पूर्ण प्रकरणात के. पी. गोसावी हा मुख्य आरोपी आहे. त्यानंतर समीर वानखेडे आणि अन्य अधिकाऱ्यांवर आरोप करता येऊ शकतात, असे ॲड. इंगळे म्हणाले.
आर्थिक वाद
गोसावी आणि प्रभाकरमध्ये आर्थिक वाद झाला होता. परिणामी प्रभाकरने या पूर्ण घटनेबद्दल माहिती उघड केली. या घटनेची चौकशी करण्यासाठी एनसीबीची विशेष टीम दिल्लीहून मुंबईत दाखल झाली. या विशेष पथकासमोर प्रभाकरने आपला जबाब नोंदवला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनीही तपास करत प्रभाकरचा जबाब नोंदवलेला होता. हा जबाब एनसीबी पथकाने केलेल्या तपासात मुख्य पुरावा ठरला.
अकस्मात मृत्यू
आर्यन खान प्रकरणाचा तपास कालांतराने थंडावला. प्रभाकर आपले रोजचे आयुष्य जगत होता या प्रकरणानंतर त्याला पोलिसांनी कोणतीही सुरक्षा दिली नाही. मार्च २०२२ला प्रभाकरला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला गेला; परंतु पोलिस तपासात काही संशयास्पद सापडले नाही.