शिंदे गट-भाजपमध्ये धुसफूस

शिंदे गट-भाजपमध्ये धुसफूस

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १९ : भाजपचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने केलेल्या आरोप प्रकरणात आता थेट भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट एकमेकांसमोर आले आहेत. एका महिलेचा वापर करून आपल्याला आणि आमदार मंदा म्हात्रे यांना नाहक बदनाम करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी नाव न घेता गणेश नाईक यांच्यावर केला.
याप्रकरणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चौगुले यांनी दीपा चौहान आणि चौगुले यांच्यात झालेल्या संभाषणाची ध्वनिफीतही ऐकवली. आपल्याला बदनाम करण्यासाठी या महिलेला तब्बल ५० लाख रुपये दिल्याचा आरोप चौगुले यांनी केला. याप्रकरणी दीपा चौहान आणि गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर काही दिवसांपूर्वी या महिलेने नेरूळ पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपातून नाईक यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे; पण नुकतेच या महिलेने नेरूळ पोलिस ठाण्यात आमदार मंदा म्हात्रे व शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या सांगण्यावरून नाईक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असल्याचे निवेदन नेरूळ पोलिस ठाण्यात दिले आहे. यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले सानपाडा येथील वडार भवनमध्ये पत्रकार परिषद घेत या महिलेने केलेल्या आरोपाचे खंडन केले. तसेच या गुन्ह्यामध्ये आम्हाला बदनाम करण्याचे षड्‍यंत्र रचले जात असल्याचादेखील आरोप केला. या महिलेने केलेल्या आरोपाविरोधात न्यायलयात दावा करणार असल्याचे चौगुले यांनी स्पष्ट केले.
...
नार्को टेस्ट करा!
‘दीपा चौहान या महिलेने दिलेल्या पत्राबद्दल पोलिसांनी योग्य तो तपास करण्याची मागणी उपायुक्तांना भेटून करणार आहे. या महिलेची नार्को टेस्टदेखील करण्याची मागणी करणार आहोत,’ असे विजय चौगुले यांनी सांगितले. तसेच दीपा चौहान यांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, अशी मागणी करणार असल्याचेही चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या महिलेचा बोलवता धनी वेगळा आहे, असा आरोपही चौगुले यांनी केला.
...
चौगुले-नाईक जुने वैर
शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचे आमदार गणेश नाईक यांच्यासोबत असणारे वैर सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत राज्यात शिवसेना आणि भाजपची सत्ता आल्यानंतर हे वैर कमी होईल, असे वाटत असताना पुन्हा दीपा चौहान प्रकरण पुढे आल्याने नवी मुंबईचे राजकारण तापले आहे. आता या प्रकरणात नाईकांविरोधात त्यांच्याच पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनीदेखील शड्डू ठोकल्याने भाजप युतीमध्ये लवकरच वादाच्या ठिणग्या पाहायला मिळणार, असे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com