कष्टकरी, कामगारांना रात्रीपण उपचार

कष्टकरी, कामगारांना रात्रीपण उपचार

नवीन पनवेल, वार्ताहर
पनवेल महापालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्रे आता रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती केली असून मंगळवार (ता.१६) पासून ही सुविधा पालिका क्षेत्रात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कष्टकरी तसेच कामगारांसाठी ही सुविधा अधिक लाभदायक ठरणार आहे.
--------------------

महापालिका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना अगदी माफक दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देते. यात डॉक्टर तसेच विशेष तज्ज्ञांकडून आरोग्य सल्ला, प्राथमिक आरोग्य उपचार, आपत्कालीन सेवा, संसर्गजन्य रोग उपचार, असंसर्गजन्य रोग उपचार, उच्च रक्तदाब, मधुमेह तपासणी व प्रतिबंध नियंत्रण, ताप दवाखाना, प्रसूतिपूर्व सेवा, नवजात शिशूंना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, नियमित लसीकरण, कोविड लसीकरण, समुपदेशन अशा विविध सेवा पुरवल्या जातात. तसेच पालिका क्षेत्रातील गरोदर माता, ज्येष्ठ नागरिकांना या सुविधांचा लाभ मिळत आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रातील सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आता रात्री १० पर्यंत आरोग्य सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी नव्याने भरती करण्यात आली असून नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन पनवेल महापालिकेने केले आहे.
--------------------------------------------
हातावर पोट असणाऱ्यांना मदत
किरकोळ दुखापत किंवा दुखणे असेल तर हातावर पोट असणाऱ्या कामगाराला कामावरून सुटल्यानंतरच दवाखान्यात जावे लागते; परंतु सायंकाळपर्यंत सवलतीच्या दरातील सरकारी दवाखाने बंद झालेले असतात. त्यामुळे नाईलाजास्तव कामगारांना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात. त्यांचा आर्थिक भुर्दंड अधिक असल्याने पनवेल महापालिकेने पुढाकार घेत कष्टकऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे.
------------------------------------------
पालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा प्रमुख उद्देश आहे. वेळेअभावी रुग्णांची गैरसोय होऊ नये. तसेच खासगी दवाखान्यांमधील खर्च लक्षात घेता रात्री दहापर्यंत सेवा मिळणार आहे.
- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com