लग्नसोहळ्यात डीजेमुळे कानठळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नसोहळ्यात डीजेमुळे कानठळ्या
लग्नसोहळ्यात डीजेमुळे कानठळ्या

लग्नसोहळ्यात डीजेमुळे कानठळ्या

sakal_logo
By

नवीन पनवेल, वार्ताहर
लग्न हा मंगलमय सोहळा मानला जातो. पूर्वीच्या काळी हा सोहळा अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होत होता. दोन-तीन दिवस चालणाऱ्या या समारंभात वऱ्हाडी मंडळी बैलगाडीतून वधूच्या घरी पोचायची. सारे गाव एक होऊन या कार्यक्रमात झटायचा. आज मात्र स्वरूप बदलले असून पारंपरिक वाद्यांच्या सुरांची जागा डीजेने घेतली असल्याने पिपाणी आणि सनईचा सूरही मोजक्याच कार्यक्रमात दिसत आहे.
----------------------------------
ताशा, सनई, ढोल या वाद्यांशिवाय लग्नकार्य पूर्वी पार पडत नव्हते. या वाद्यांना मंगलमय वाद्य, असे म्हटले जायचे. लग्नापूर्वी नवरदेवाला गावच्या मारुती मंदिरात दर्शनासाठी घेऊन जाताना वातावरण अधिकच मंगलमय होत होते. लग्नात ही मंगलमय वाद्ये वाजलीच पाहिजेत, असा आग्रह पाहुणे मंडळींकडून धरला जात असायचा. अगदी पूर्वीपासून चालत आलेली वाद्यांची प्रथा आता मात्र मागे पडत आहे. कारण डीजे आणि बॅन्जो, बँडच्या जमान्यात सनई हे एकमेव वाद्य आज तग धरून आहे. पनवेल परिसरात हाताच्या बोटावर मोजण्याएवढे सनई वाजवणारे कलाकार शिल्लक आहेत. कारण डीजेच्या दणक्याने पारंपरिक संस्कृतीवर घाला घातल्याने सनई वाजवणारेही मोजकेच आहेत. यामुळे पूर्वीप्रमाणे गावपातळीवर पारंपरिक वाद्ये वाजवणारी मंडळीही आता फारशी राहिलेली नसल्याने पारंपरिक वाद्यांची ही कला लोप पावली आहे.
------------------------------
ध्वनिप्रदूषणात भर
सनई-चौघडा, मृदंग, तबला, टाळ, बासरी ही वाद्ये म्हणजे मंगलवाद्ये असून यामुळे आपोआपच वातावरण मंगलमय होते. याऊलट डीजेमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ झाली असून आवाजाची वाढती तीव्रता शरीरासाठी घातक ठरत आहे.