
विकास कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
अंबरनाथ, ता. २० (बातमीदार) : अंबरनाथमध्ये मूलभूत नागरी विकासकामांकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवून दिलासा न दिल्यास उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही, आंदोलने सुरू होतील, कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा नाईलाजाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करावी लागेल, असा इशारा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पालिका प्रशासनाला दिला.
पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे, पावसाळ्यापूर्वीची आणि नंतरची कामे, प्रलंबित विकास कामे, मोठ्या प्रस्तावाची मंजूर झालेली विकास कामे याबाबतचा आढावा घेण्यासाठी आमदार डॉ. किणीकर यांनी नगरपालिकेत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत नगरपालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने विकास कामे होत नाहीत, असा तक्रारीचा सूर शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी लगावला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, प्रज्ञा बनसोडे, अब्दुल शेख, परशुराम उगले, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, पंकज पाटील, रवी पाटील, चंद्रकांत भोईर, शैलेश भोईर, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके आदी उपस्थित होते. या बैठकीत आमदार डॉ. किणीकर यांनी पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत कार्यरत रहावे याबाबत खडे बोल सुनावले.
....
आंबेडकर आणि वारकरी भवनाचा आढावा
नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पालिकेत सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि त्यांच्या शंकांचे त्वरित निरसन करावे, पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण व्हावीत, पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात बसवण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत निधीला मंजुरी मिळाली असल्याने पुतळ्याच्या जागेसंदर्भात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची समिती नेमावी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि पालेगाव येथे वारकरी भवन उभारण्याबाबत कार्यवाहीचा आमदार डॉ. किणीकर यांनी आढावा घेतला.
....
अंबरनाथ शहरातील सर्व नागरी विकास कामे, अपूर्ण अवस्थेतील कामे पूर्ण करणे, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाईल, दर मंगळवार आणि गुरुवारी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्याला प्राधान्य देऊ.
- डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका