जैवविविधतेमुळे पक्ष्यांना आरोग्यमय

जैवविविधतेमुळे पक्ष्यांना आरोग्यमय

प्रसाद जोशी, वसई

शहरात सिमेंट काँक्रिटीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे त्याचा जैवविविधतेवर परिणाम होऊ लागला आहे. सजीवातील विविध जाती, प्रजाती, जनुकीय यावर जैवविविधतेचे मोजमाप ठरवले जाते. त्यामुळे हे प्रमाण टिकून राहावे म्हणून वसई-विरार महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. पर्यावरण अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्यात जैवविविधता टिकवण्यासाठी त्यादृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. २२ मे हा जागतिक जैवविविधता दिन साजरा केला जातो.

वसई, विरार शहराला निसर्गरम्य परिसरासह डोंगर व विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे ‘हरित वसई’ अशी तालुक्याची ओळख आहे, मात्र हळूहळू सिमेंट काँक्रिटीकरणाचे जंगल वाढत आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने वृक्षलागवड करून पक्ष्यांना आकर्षित करणे, त्यांचा अधिवास कायम ठेवणे, जैवविविधतेसाठी विविध उपाययोजनांवर भर देण्यास सुरुवात केली आहे.

जैवविविधता ही भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. तलाव, नदी, पाणथळ जागा, पक्षी, चारा याचे प्रमाण व देखभाल केल्यास जैवविविधतेला बळकटी मिळते. सद्यस्थितीत हवामानात होणारे बदल पाहता जैवविविधता अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जात आहे. वसई, विरार शहरांत फेब्रुवारी महिन्यात एकूण ३२ ठिकाणी पक्षीनिरीक्षण केले होते. या गणनेत १७२ प्रजाती आढळल्या आहेत, तर पाणवठ्यावर वास्तव्यास ६,९२३ पक्षी दिसून आले होते. शहरातील हिरवागार परिसर आल्हाददायक असल्याने अधिवास व भक्ष्य पाहता विविध राज्य, परदेशातील पक्षी आकर्षिले जात आहेत.

महापालिकेने पहिल्यांदाच पक्षीगणना करून जैवविविधतेवर अभ्यास केला आहे. या मोहिमेत अनेक पक्षीप्रेमी सहभागी झाले होते. वसई, विरार शहरांतील विविध भागांत दुर्मिळ पक्षी शोधात येत असल्याचे निदर्शनास आले. सजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे वसई, विरार शहरांत पक्ष्यांना पूरक वातावरण मिळणार आहे. तसेच विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्याची मोहीम सुरू असल्याने शहर परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट नागरिकांना सुखावून जाणार आहे. मात्र मानसिक आरोग्याला हा प्रयोग उत्तम ठरणार आहे.

वातावरणनिर्मितीचा प्रयत्न
जैवविविधतेच्या विनाशामुळे निसर्गावर परिणाम होत असतो. त्यामुळे अधिकाधिक पक्षी, वृक्ष व सजीवांना संजीवनी मिळावी व त्यातून वसई-विरार शहरात सुंदर, मनमोहक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी पावले उचलली जात असल्याने आरोग्याला हितकारक ठरणार आहे.

कारवाईचे निर्देश
वसई, नालासोपारा, विरार व नायगाव परिसरात गवताळ भाग सजीवांना फायदेशीर ठरत असते. त्यामुळे याठिकाणी नैसर्गिकरित्या उगवलेले गवत सुरक्षित असावे, म्हणून पालिकेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचबरोबर केमिकलयुक्त पाण्यात कोणी गवत उगवून पक्षी, प्राण्यांना धोका निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे उपायुक्त डॉ. सागर घोलप यांनी स्पष्ट केले.

वसई-विरार महापालिकेच्या परिसरात पक्ष्यांचा अधिवास ठिकठिकाणी आढळला आहे. त्यांना सुरक्षा मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जैवविविधतेसाठी गवत, मोकळी जागा, पाणथळावर काम केले जात आहे.
- डॉ. सागर घोलप, उपायुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com