गटारावरील झाकणे जीवघेणी

गटारावरील झाकणे जीवघेणी

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. २० : कल्याण पश्चिमेतील डीबी चौक ते म्हसोबा चौक दरम्यान रस्त्यावरील चेंबरची जाळी मध्यभागी तुटल्याने धोकादायक झाली आहे. यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. एका जागरूक नागरिकाने ही गोष्ट ट्विट करत पालिका प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे. पावसाळा तोंडावर आला असताना गटारांच्या तुटलेल्या झाकणांकडे पालिका प्रशासन लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ठाकुर्ली ९० फिट रोड येथील फूटपाथवरील गटाराचे झाकण तुटल्याने गटारात पडून सुंदरम अय्यर (वय ५०) हे नागरिक जखमी झाल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. शहरातील अनेक ठिकाणी गटारांवरील झाकणे तुटली असून त्यावर दुकानदार लाकडी फळी, दगड टाकून ठेवलेले दिसतात. महिनोंमहिने या गटारांच्या झाकणांची दुरुस्ती होत नाही. त्यातच नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांवरील गटारांची झाकणे, जाळ्याही चांगल्या पद्धतीने बसवलेल्या नसल्याने ती झाकणे देखील तुटल्याचे दिसून येते. कल्याण पश्चिमेतील डीबी चौक ते म्हसोबा चौक येथील रस्त्यावरील चेंबरची जाळी मधोमध तुटून धोकादायक झाली आहे. रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात न आल्यास त्यात त्यांचा पाय जाऊन दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रस्त्यावरील भटक्या प्राण्यांनाही याचा धोका होऊ शकतो. वाहनचालकांच्या ही गोष्ट लक्षात न आल्यास अपघात होण्याचा धोका आहे.
....
प्रकरण संबंधित विभागाकडे
गटारांवरील झाकणांबाबत एका जागरूक नागरिकाने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनास ट्विट करत ही बाब उघडकीस आणली आहे. यावर प्रशासनाने संबंधित विभागास याविषयी कळविण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

पासाळ्यापूर्वी दुरुस्ती करा
पावसाळा तोंडावर आला असून गटारांवरील झाकणांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. अति पावसामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यास अनेकदा या तुटलेल्या झाकणांचा अंदाज येत नाही. फूटपाथवरील गटारांच्या तुटलेल्या झाकणांचाही अनेकदा अंदाज न आल्याने अपघात होतात. यामुळे या तुटलेल्या झाकणांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com