ठाण्यातील ७० टक्के रस्त्यांची कामे पूर्ण

ठाण्यातील ७० टक्के रस्त्यांची कामे पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात प्रभाग समितीनिहाय विविध ठिकाणी यूटीडब्ल्यूटी, सिमेंट काँक्रिटीकरण, मास्टिक पद्धतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत. नागरिकांना चांगल्या प्रकारचे व खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सध्या सुरू असलेली कामे ६० ते ७० टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील या दृष्टीने युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश देत असतानाच रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत, अशा सूचना त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकतीच बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कार्यकारी अभियंतानिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. सध्या सुरू असलेल्या कामांची स्थिती, त्याची अपेक्षित काम पूर्ण होण्याची तारीख, काम पूर्ण करण्यात काही अडचणी असतील तर त्या कशा सोडविता येतील या बाबींची चर्चा करण्यात आला. यापूर्वी पूर्ण झालेल्या कामांची बिले सादर झाली आहेत का? गुणवत्तापूर्ण कामे केली असतील तर देयके प्रलंबित राहणार नाही याबाबत दक्ष रहा अशा सूचना आयुक्त बांगर यांनी केल्या. रस्त्यांची कामे ही दर्जेदार पद्धतीने होतील यासाठी सर्व कार्यकारी अभियंत्यांनी या कामावर नजर ठेवा. शहरातील जे मुख्य रस्त्यांना प्रथम प्राधान्य देवून ही कामे तातडीने पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करावे, सर्व कार्यकारी अभियंत्यांनी सुरू असलेल्या कामांचा वेळोवेळी दर्जा तपासून संबंधित ठेकेदारास त्या प्रमाणे सूचना करून गुणवत्तापूर्ण रस्ते तयार होतील यासाठी कटाक्ष ठेवावा. रस्त्यांची कामे करत असताना कलव्हर्ट, जॉइंट फिलींग, लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंगची कामे देखील एकमार्गी पूर्ण करावीत. ठेकेदारांची बिले अदा करण्यात आली आहे, त्यामुळे बिले अदा झाली नाही ही सबब चालणार नाही तसेच नव्याने तयार झालेल्या रस्त्यांची कामे जर खराब झाली तर ती खपवून घेतली जाणार नाही असा सूचक इशाराही या बैठकीत आयुक्त बांगर यांनी दिला.
सध्या मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असल्यामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे, याची जाणीव ठेवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण कशी होतील यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत अशा सूचनाही या बैठकीत दिल्या. कामे चालू असताना लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्याकडून कामाबाबत जो फिडबॅक मिळतो, तो तपासून घ्यावा व त्यामध्ये काही कार्यवाही करण्यायोग्य मुद्दे आढळल्यास त्याची अंमलबजावणी व्हावी असेही आयुक्तांनी नमूद केले.
................................

शहरासाठी ६०५ कोटींचा निधी
ठाणे शहरासाठी राज्य शासनाकडून ६०५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या अंतर्गत सध्या २८२ रस्त्यांची कामे प्रभाग समितीनिहाय सुरू आहेत. महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची कामे, सरकारी योजनांमधून सुरू असलेली रस्त्यांची कामे, इतर प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा या बैठकीत आयुक्तांनी घेतला. ठाणे महापालिका हद्दीत २१४ कोटी अंतर्गत १२७ रस्त्यांची कामे सुरू आहेत. तर, ३९१ कोटी अंतर्गत १५५ रस्त्यांची कामे सुरू आहेत.
..
डेब्रीज तातडीने उचला
रस्त्याची कामे करीत असताना रस्त्यावर पडलेले डेब्रीज तातडीने उचलले गेले पाहिजे. रस्त्याची कामे सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांना दिसतील अशा पद्धतीने फलक लावा जेणेकरून त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. रस्त्यांची कामे ही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घेण्यासाठी तिन्ही पाळ्यांमध्ये कामे सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
.......
विविध प्राधिकरणाशी समन्वय
शहरात विविध प्राधिकरणाची कामे सुरू आहेत. घोडबंदर रोडवर तसेच ज्या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत, त्या प्राधिकरणाशी चर्चा करून कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने मार्ग काढावा. रस्त्यावर खड्डा पडलेला अजिबात खपवून घेणार नाही असेही त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com