राज्यातील १२३ स्थानकांचा पुनर्विकास

राज्यातील १२३ स्थानकांचा पुनर्विकास

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : भारतीय रेल्वेवरील स्थानकांच्या विकासासाठी ‘अमृत भारत स्थानक’ योजना अलीकडेच सुरू करण्यात आली आहे. सध्या या योजनेत देशभरातील एक हजार २७५ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून, यात महाराष्ट्रातील १२३ स्थानकांचा समावेश असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेंतर्गत राज्यातील १२३ स्थानकांचा समावेश आहे. यात मुंबई विभागातील अंधेरी, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, भायखळा, चर्नी रोड, सीएसएमटी, चिंचपोकळी, दादर, जोगेश्वरी, कल्याण, कांजूरमार्ग, कुर्ला, एलटीटी, लोणावळा, लोअर परळ, मालाड, मरिन लाईन्स, माटुंगा, मुंब्रा, मुंबई सेंट्रल, सॅण्डहर्स्ट रोड, टिटवाळा, विद्याविहार, विक्रोळी, ठाणे, वडाळा रोड स्थानकांचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या १५; तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील १२ रेल्वेस्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक’ योजनेंतर्गत कायापालट केला जाणार आहे.

भारतीय रेल्वेने या योजनेंतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाची घोषणाही केली आहे. याकरिता यंदाच्या अर्थसंकल्पात ८५० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. ‘अमृत भारत स्थानक’ योजनेत इमारतीतील सुधारणा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्थानकांचे एकत्रीकरण, मल्टिमॉडल इंटिग्रेशन, दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधा, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय, बॅलेस्टलेस ट्रॅकची तरतूद, आवश्यकतेनुसार ‘रूफ प्लाझा’ समाविष्ट आहेत.

अशी आहे योजना ?
‘अमृत भारत स्थानक’ योजना दीर्घकालीन दृष्टिकोनातून तयार करण्यात आली आहे. यामध्ये स्थानकावरील प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करून त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. देशभरातील रेल्वेस्थानकांवरील सुविधा सुधारणे, फिरणारे क्षेत्र, प्रतीक्षालय, शौचालये, आवश्यकतेनुसार लिफ्ट/एस्केलेटर, स्वच्छता, मोफत वाय-फाय, स्थानिक उत्पादनांसाठी किऑस्क, ‘एक स्टेशन एक उत्पादन’ योजनेंतर्गत प्रत्येक स्थानकाची गरज लक्षात घेऊन उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, एक्झिक्युटिव्ह लाऊंज, व्यवसाय बैठकीसाठी नामांकित जागा, लँडस्केपिंग आदींचा यात समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com