
ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू
नेरळ, ता. २० (बातमीदार) : कर्जत तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका दाम्पत्याला ट्रकने चिरडल्याची घटना घडली होती. तसेच एका युवकालादेखील ट्रकमुळे जीव गमवावा लागला होता. या घटना ताज्या असताना शनिवारी (ता. २०) पुन्हा कर्जत-पळसदरी रस्त्यावर एका दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने उडवले. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर रहदारीदेखील नव्हती. त्यामुळे जखमींना वेळेत मदत मिळाली नाही. यामुळे या दाम्पत्यापैकी पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नीरा ठोंबरे (रा. कुंडलज) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील कुंडलज या गावामध्ये ठोंबरे कुटुंब भाजीचा व्यवसाय करतात. त्यासाठी लागणारी भाजी घेण्यासाठी शनिवारी पहाटे सुरेश ठोंबरे व त्यांची पत्नी नीरा ठोंबरे हे खोपोली येथे भाजी खरेदीसाठी निघाले होते. कर्जत-खोपोली रस्त्याने हे दाम्पत्य जात असताना कर्जत खोपोली रस्त्यावर नव्याने उभारल्या जाणाऱ्या टोलनाक्याजवळ कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना धडक दिली. या धडकेत सुरेश ठोंबरे यांच्या मणक्याला मार लागला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. पहाटे रहदारी नसल्यामुळे बराच उशीर त्यांना मदत मिळाली नव्हती. अखेर खोपोली येथून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या एका युवकाला ही घटना लक्षात येताच त्याने मदतीसाठी एका ग्रुपला कळवले. त्यानुसार शैलेश मांडवकर हे घटनास्थळी पोहचेपर्यंत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. त्यांनी सुरेश ठोंबरे व त्यांच्या पत्नीला तेथून कर्जत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सुरेश ठोंबरे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्या मणक्याला मार लागला आहे. घटनेची नोंद कर्जत पोलिस ठाण्यात करण्यात आहे.