
चकमकफेम अधिकारी दया नायक गुन्हे शाखेत
अंधेरी, ता. २० (बातमीदार) : चकमकफेम अधिकारी दयानंद नायक ऊर्फ दया नायक यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांची गुन्हे शाखा वांद्रे युनिटचे प्रभारी म्हणून नेमणूक झाली आहे. त्यांच्यासह इतर पाच अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत.
एटीएसमध्ये कार्यरत असलेले दया नायक यांची अलीकडेच मुंबई पोलिस दलात बदली झाली होती. मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून दया नायक हे परिचित असून देवेन भारती यांच्या बदलीनंतर नायक हे पुन्हा मुंबई पोलिस दलात रुजू होतील, असा अंदाज होता. त्यांची एटीएसमधून बदली झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेर त्यांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे.
नायक यांच्यासोबत राज्य गुप्तवार्ता विभागातून बदली झालेल्या पोलिस निरीक्षक राहुल म्हस्के यांची मानखुर्द पोलिस ठाणे, शिवाजी पाळदे यांची मरिन ड्राईव्ह, सलील भोसले यांची पूर्व नियंत्रण कक्ष, सोलापूर ग्रामीणचे प्रदीप काळे यांची बोरिवली पोलिस ठाणे आणि मनोहर आव्हाड यांची पूर्व नियंत्रण कक्षातून वाहतूक विभागात बदली झाली आहे.
तस्कराविरुद्ध विशेष मोहीम
दया नायक यांनी संघटित टोळीतील अनेक गुंडांसह लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांचा चकमकीत खात्मा केला. गुंड टोळ्यांकडून मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रसाठा जप्त करून अनेक गुन्हे उघडकीस आणते. आंबोली ठाण्यात रुजू झाल्यानंतर त्यांनी ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली होती. या मोहिमेंतर्गत त्यांनी अनेक ड्रग्ज तस्करांना अटक करून एमडी ड्रग्ज बनविणाऱ्या कारखान्यासह कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त केला होता.