Sameer Wankhede : समीर वानखेडेंची पाच तास चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sameer Wankhede
समीर वानखेडेंची पाच तास चौकशी

Sameer Wankhede : समीर वानखेडेंची पाच तास चौकशी

मुंबई : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांची पाच तासांहून अधिक काळ चौकशी केली. त्यासाठी सीबीआयच्या आठ अधिकाऱ्यांचे पथक थेट दिल्लीहून मुंबईत दाखल झाले होते.

या वेळी सीबीआयने एनसीबी कार्यालयात व्हिडीओ फुटेजशी छेडछाड असो किंवा सुपरस्टार शाहरूख खानशी कथित खंडणी असो, वानखेडेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. आर्यन खानला अडकवण्यासाठी शाहरूखकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप वानखेडेंवर आहे.

समीर वानखेडे शनिवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील सीबीआयच्या कार्यालयात पोहोचले. कार्यालयात प्रवेश करत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधत वानखेडे यांनी फक्त ‘सत्यमेव जयते’ म्हटले. दुपारी साडेचारच्या सुमारास वानखेडे यांची चौकशी पूर्ण झाली आणि ते कार्यालयातून बाहेर पडले.

त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीआयसमोर त्यांची पहिलीच हजेरी होती. एनसीबीच्या तक्रारीवरून सीबीआयने वानखेडे आणि इतर चार जणांवर ११ मे रोजी कथित भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत लाचखोरीच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला. शुक्रवारी (ता. १९) उच्च न्यायालयाने सीबीआयला वानखेडे यांना २२ मेपर्यंत अटकेची कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले होते.

सीबीआयचे आरोप
१) सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात समीर वानखेडे यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यात के. पी. गोसावी हा वानखेडे यांच्यासाठी शाहरूख खानच्या सचिवाशी डील करत होता.
२) वानखेडेंच्या सांगण्यावरून गोसावीने आर्यन प्रकरणात २५ कोटींची मागणी केली होती. या रकमेच्या बदल्यात आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अडकवणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते.
३) वानखेडे यांनी गोसावीला सौद्याच्या पैशाच्या प्रकरणात संपूर्ण सूट दिली होती. गोसावीने १८ कोटींचा सौदा पक्का केला होता. एवढेच नाही, तर गोसावीने ५० लाख रुपये आगाऊ घेतल्याचा सीबीआयचा आरोप आहे.

बेहिशेबी मालमत्ता?
सीबीआयने केलेल्या तपासात समीर वानखेडेंनी आपल्या परदेश प्रवासाबाबत योग्य माहिती दिली नव्हती. त्यांनी त्यांच्या महागड्या घड्याळ आणि कपड्यांबद्दल समाधनकारक माहिती दिली नाही. वानखेडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेचाही सीबीआयने नोंदविलेल्या गुन्ह्यामध्ये उल्लेख आहे.

सीबीआयला हवी असलेली सर्व कागदपत्रे मी सुपूर्द केलेली आहेत. आजची चौकशी संपली असली, तरी सीबीआयने पुन्हा मला बोलावल्यास मी चौकशीला सामोरे जाईल. मी कुठलेही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे मी चौकशीपासून मागे हटणार नाही. सत्यमेव जयते.
- समीर वानखडे, आयआरएस