
सरस्वती विद्यालयाची प्रगती कौतुकास्पद
विरार (बातमीदार) : सरस्वती विद्यालयाची शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रामधील प्रगती कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील शाळेने जिल्हा पातळीबरोबरच राज्य स्तरावरही आपला ठसा उमटवला आहे. हे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या मेहनतीचे फळ आहे, असे सांगत वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी संस्थेचे अध्यक्ष डी. के. पाटील आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले. ते ग्रामविकास मंडळ, वैतारणा संचलित फणसपाडा येथील सरस्वती विद्यालयाच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्वर्गीय काळुबाई कान्हा पाटील प्राथमिक विद्यालयाच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशिनाथ पाटील, पंचायत समिती सभापती अशोक पाटील, मुख्याध्यापिका सविता किणी, हिना माळी, हर्षला म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. वास्तूच्या बांधकामासाठी आर्थिक अथवा वस्तू स्वरूपात साह्य करणाऱ्या देणगीदारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.