विरारच्या तरुणाचे मृत्यूपश्चात अवयवदान

विरारच्या तरुणाचे मृत्यूपश्चात अवयवदान

विरार, ता. २० (बातमीदार) : ‘मरावे परी कीर्तिरुपी उरावे’ या उक्तीनुसार विरार येथील तरुणाचे मृत्यूपश्चात अवयवदान करण्यात आले. विरार येथील तरुणाचा बेंगळूर येथे दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याची पत्नी व आई-वडील यांनी त्याच्या मृत्यूपश्चात अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. साकेत दंडवते (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या अवयवदानामुळे हृदय, यकृत, मूत्रपिंड, कॉर्निया, डोळे यामुळे नऊ जणांना जीवनाची नवीन उमेद मिळून नवसंजीवनी मिळणार आहे.
विरारमधील प्रसिद्ध डॉ. विनित दंडवते व डॉ. सुमेधा दंडवते यांचा साकेत हा मोठा मुलगा असून बेंगळूर येथील ओके क्रेडिट कंपनीत तो कामाला होता. पुण्यावरून १५ मे रोजी बेंगळूर येथे दुचाकीवरून जात असताना महामार्गावर चित्रदुर्ग येथे त्याच्या दुचाकीला अपघात झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला तेथील बसवराज आप्पा मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र मेंदूला जबर दुखापत झाल्याने त्याला बेंगळूर येथील नारायण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी (ता. १९) मृत्यू झाला.

-----------------
नववधूचा धाडसी निर्णय
पाच महिन्यांपूर्वीच साकेतचा विवाह झाला होता. कुटुंबावर कोसळलेल्या या दु:खद प्रसंगाला धैर्याने सामोरे जात त्याची पत्नी अपर्णा हिने सासरे डॉ. विनित व सासू डॉ. सुमेधा यांना सावरत दु:ख पचवत साकेतच्या अवयवांचे गरजूंना दान करण्याचा मोठा निर्णय घेतला. आता त्याच्या अवयवदानातून तीन जणांना यकृत, दोन जणांना मूत्रपिंड, दोन जणांना डोळे; तर दोन मुलांना हृदयाच्या झडपा व त्वचा मिळून जीवनाची नवीन उमेद मिळणार आहे. साकेतवर बेंगळूर येथे शुक्रवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय डॉ. हेमंत जोशी यांनी दिली आहे. आपल्या मृत्यूपश्चात माझ्या मृत शरीराचे अवयवदान करण्यात यावे, अशी इच्छा यापूर्वीच साकेतने व्यक्त केली होती. दंडवते कुटुंबातील सर्वांनीच अवयवदान करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे पालनही केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com